आॅनलाईन लोकमतनागपूर : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेकडून १२ लाख ५० हजार रुपये हडपणाऱ्या तिघांविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये अजनी परिसरात नेहमी चर्चेत राहणाऱ्या अनिल इलमकर (वय ४५) याचाही समावेश आहे.रमानगरातील रहिवासी शालिनी अमरकांत शिंगाडे (वय ४२) यांच्या तक्रारीनुसार आरोपी अनिल इलमकर, अशोक उंबरकर आणि रेखेंद्र ब्राम्हणे (सर्व रा. सप्तगिरी, नरेंद्रनगर) यांनी त्यांना चार वर्षांपूर्वी अनुकंपा तत्त्वावर वडिलांच्या जागेवर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी थोडा फार खर्च करावा लागतो, असेही सांगितले. शिंगाडे यांनी तशी तयारी दाखवल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडून वेगवेगळे कारण सांगून चार वर्षांत १२ लाख ५० हजार रुपये घेतले. एवढी मोठी रक्कम घेऊनही आरोपी नोकरी लावून देण्यासाठी प्रत्येक वेळी असंबद्ध कारण सांगत होते. ते तिघेही विसंगत उत्तरे देऊन एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने, त्यांनी फसवणूक केल्याचे शिंगाडे यांच्या लक्षात आले. त्यामुळे अजनी ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी चौकशीअंती सोमवारी गुन्हा दाखल केला.उलटसुलट चर्चेला उधाणआरोपी इलमकर आणि अन्य जण वेगवेगळ्या कारणामुळे अजनी परिसरात नेहमी चर्चेत राहतात. हे काम करून देतो, ते काम करून देतो, असे सांगत असल्यामुळे त्यांच्याकडे संपर्क करणाऱ्यांचीही गर्दी असते. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याचे कळाल्याने अजनीत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.