नागपूर : रिधोरा (ता. कुही) हे गाव ८५ वर्षांपूर्वी वसले असल्याची माहिती स्थानिक वयोवृद्ध नागरिक देत असून, तशी शासनदप्तरी नोंद आहे. मात्र, सदर गाव वसलेल्या जागेचा सातबारा आपल्या नावावर असून, संपूर्ण गाव अतिक्रमित आहे, असा दावा महिलेने केल्याने खळबळ उडाली आहे.रिधोरा गावाचा समावेश बानोर (ता. कुही) गटग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आला आहे. या गावात १० ते १२ घरे असून, येथील नागरिकांना बानोर गटग्रामपंचायत प्रशासनाने रस्ते, वीज, पाणी यासह अन्य नागरी सुविधा पुरविल्या आहेत. शिवाय, येथील नागरिक ग्रामपंचायत प्रशासनाला मालमत्ता, पाणी व दिवाबत्ती कराचा भरणाही नियमित करतात. गाव वसलेल्या जागेवर आजवर कुणीही मालकी हक्क सांगितला नाही. मात्र, ही जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा करीत बेबीनंदा ठाकरे, रा. नागपूर यांनी ग्रामस्थांना नोटीस बजावल्या आहेत.बेबीनंदा ठाकरे या ग्रामस्थांच्या साधेभोळेपणाचा फायदा घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रिधोरा गावाचा समावेश बानोर गट ग्रामपंचायतीत केला आहे. पंचायत विभागाच्या दस्तऐवजांमध्ये नोंद आहे. त्यामुळे गाव वसलेली जागा ही इतर कुणाच्याही मालकीची नाही, असे बानोरच्या सरपंच अनिता बदन यांनी सांगितले.
अजबच! महिलेने सांगितला संपूर्ण गावावर मालकी हक्क!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 5:44 AM