लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रसूतीनंतर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला उपचार करणारे डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरला अटक करून त्यांचा वैद्यकीय व्यवसाय परवाना रद्द करण्याची मागणी केली. त्यातच नातेवाईकांसह नागरिकांनी कामठी - कळमना मार्गावर सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास ‘रास्ता रोको’ आंदोलन करायला सुरुवात केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.प्रियंका कैलास मुळे (२२, रा. प्रभाग क्रमांक - १, येरखेडा, ता. कामठी) असे मृत महिलेचे नाव आहे. प्रियंका मुळे यांना प्रसूतीसाठी कामठी शहरातील राठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. बाळाच्या जन्मानंतर रविवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे डॉ. राठी यांनी प्रियंका मुळे यांना कामठी - कळमना मार्गावरील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास हलविले. मात्र, डॉ. राठी यांनी त्यांना हलविण्याबाबत रुग्णाच्या कुटुंबीयांना कोणतीही पूर्वसूचना दिली नाही, असे नातेवाईकांनी सांगितले. हा प्रकार तसेच प्रियंका यांची प्रकृती खालावली असल्याचे कळताच त्यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये एकच गर्दी केली.कुटुंबीयांनी प्रियंका यांना भेटण्याची इच्छा व्यक्त करताच त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून, उपचार सुरू असल्याचे वेळावेळी सांगण्यात आले. शिवाय, डॉक्टरांनी त्यांना कुणालाही भेटू दिले नाही. त्यातच नागरिकांनीही हॉस्पिटलमध्ये गर्दी करायला सुरुवात केली. नागरिकांची गर्दी लक्षात घेता डॉक्टरांनी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पोलिसांना सूचना देऊन हॉस्पिटलमध्ये बोलावले आणि प्रियंकाचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.प्रियंका यांच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबीय व नातेवाईकांसह संतप्त नागरिकांनी हॉस्पिटलबाहेर कामठी - कळमना मार्गावर ‘रास्ता रोको’ करायला सुरुवात केली. त्यांनी संबंधित डॉक्टरला अटक करून त्यांचा वैद्यकीय व्यवसाय परवाना रद्द करण्याची मागणी रेटून धरली होती. सदर आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरूच होते.तणावसदृश परिस्थितीआंदोलनाची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र कदम, उपायुक्त हर्ष पोद्दार, सहायक पोलीस आयुक्त राजेश परदेशी, पोलीस निरीक्षक बापू ढेरे, पुंडलिक भटकर घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी मृताच्या कुटुंबीयांची समजूत काढत त्यांना व संतप्त नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबीय त्यांच्या मागणीवर ठाम असल्याने तिढा सुटू शकला नाही. त्यामुळे घटनास्थळी तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच पावसाला सुरुवात झाली. परंतु, नागरिक हॉस्पिटलसमोरून हटले नाही.
महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू : नागपूरनजीकच्या कामठीत ‘रास्ता रोको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 9:40 PM
प्रसूतीनंतर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला उपचार करणारे डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरला अटक करून त्यांचा वैद्यकीय व्यवसाय परवाना रद्द करण्याची मागणी केली. त्यातच नातेवाईकांसह नागरिकांनी कामठी - कळमना मार्गावर सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास ‘रास्ता रोको’ आंदोलन करायला सुरुवात केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
ठळक मुद्देडॉक्टरला अटक करण्याची मागणी