बुटीबोरी (नागपूर) : हिंगणघाट येथून बाइकने आईला मामाच्या घरी नागपूर येथे घेऊन जात असताना चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भरधाव वेगाने मागून येणाऱ्या एसटीने जोरदार धडक दिली. यात आईचा मृत्यू झाला तर बाइकस्वार मुलगा जखमी झाला.
बुटीबोरीनजीकच्या शनी मंदिराजवळ बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता हा अपघात घडला. कल्पना संजय वानखेडे (४२) असे मृत महिलेचे तर संकल्प वानखेडे (२०), रा. हनुमान वॉर्ड, हिंगणघाट, वर्धा असे जखमी मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संकल्प हा आईला घेऊन हिंगणघाट येथून नागपूरला मामाकडे बाइक क्र. एमएच ३२ एजी ०१२० ने जात असताना चंद्रपूर-नागपूर महामार्गावर बुटीबोरी येथील शनी मंदिरासमोर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एसटीने जोरदार धडक दिली. यात कल्पना याखाली पडल्या आणि बसच्या चाकाखाली आल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला तर संकल्प हा जखमी झाला. अपघात होताच एसटी चालक एसटी घेऊन घटनास्थळावरून पसार झाला.
अपघाताची माहिती मिळताच बुटीबोरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश साखरकर, अमलदार भारत तायडे, युसूफ खान यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रवाना केला. जखमी संकल्पवर बुटीबोरी येथील माया हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात एसटी चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.