नागपूर : कामगार संघटनेच्या नेत्याच्या पत्नीचा तातडीचे उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. सोमवारी दुपारी रेल्वे ईस्पितळात ही घटना घडली. यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना घेराव केला. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.
नजमा हबीब खान (वय ६२) असे मृत महिलेचे नाव आहे. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एनआरएमयू)च्या झोन मुख्यालयातील कार्यकारी सदस्य हबीब खान यांच्या त्या पत्नी होत. त्यांचा बीपी वाढल्यामुळे त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रेल्वेच्या ईस्पितळात नेण्यात आले. तेथे तपासण्यासाठी डॉक्टर नव्हते. संबंधित डॉक्टरला मुंबईहून रोटेशन बेसिसवर क्षेत्रीय रेल्वे ईस्पितळात पाठविण्यात आले आहे. जेव्हा नजमा यांना ईस्पितळात आणण्यात आले तेव्हा डॉक्टर जेवणासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे उपचारात विलंब झाला. हबीब खान यांच्या आरोपानुसार, तेथे कसलीच मदत न मिळाल्यामुळे पत्नीला व्हीलचेअरवर बसवून स्वत:च हबीब खान यांनी उपचार मिळावे म्हणून केज्युअल्टीत नेले. मात्र, उपचार मिळाले नाही आणि नजमा यांनी प्राण सोडले.
दरम्यान, उपचारात विलंब झाल्याने हबीब खान यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची वार्ता कळताच एनआरएमयूच्या पदाधिकाऱ्यांनी ईस्पितळात धाव घेऊन वैद्यकीय अधीक्षकांना घेराव घातला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांची भेट घेऊन त्यांना रेल्वे ईस्पितळातील हलगर्जीपणाची माहिती दिली.
... म्हणून म्हणे जेवणाला बाहेर जातातया संबंधाने रेल्वे प्रशासनाने संबंधित डॉक्टरच्या बचावाची भूमीका घेतली आहे. नजमा खान यांचा मृत्यू दुर्दैवी असल्याचे सांगून त्या हृदयरुग्ण होत्या, त्यांची बायपास सर्जरी झाली होती, असे म्हटले. संबंधित डॉक्टर मुंबईहून येथे आले त्यामुळे ते जेवणासाठी बाहेर जातात, असा अजब युक्तीवादही डॉक्टरचा बचाव करताना रेल्वे प्रशासनाने केला आहे.