मौदा तालुक्यातील तरोडी शिवारातील घटना
रेवराल : शेतातील निंदणाचे काम आटोपून घराकडे निघालेल्या शेतमजूर महिलांच्या अंगावर वीज कोसळली. यात एकीचा मृत्यू तर तिघी गंभीर जखमी झाल्या. पुष्पा दुर्योधन बगडे (४५), रा. तुमान असे मृत महिलेचे तर बबिता गायकवाड (३८), रा. तुमान, सुनीता कोंगे (४०) आणि प्रमिला घोडमारे (३६), दोघेही रा. तरोडी अशी जखमी महिलांची नावे आहेत.
गुरुवारी सकाळी या सर्व महिला तरोडी (ता. मौदा) शिवारातील अरुण वासाडे यांच्या शेतात धानाचे निंदन करण्यासाठी गेल्या होत्या. ही शेती अतिन विठोबा गायकवाड (४०), रा. तुमान हे ठेका पद्धतीने वाहत आहे. गुरुवारी या शेतात निंदण करण्यासाठी १० ते १२ महिला होत्या. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने लवकर काम संपवून महिला घराकडे निघाल्या असता सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास वीज त्यांच्या अंगावर कोसळली. यात अरुण याची बहीण पुष्पा बगडे हिचा जागेवर मृत्यू झाला, तर पत्नी बबिता यांच्यासह सुनीता आणि प्रमिला या शेतमजूर महिला गंभीर जखमी झाल्या. जखमीपैकी बबिता आणि सुनीता यांच्यावर अरोली येथील खासगी रुग्णालयात तर प्रमिला हिच्यावर रामटेक येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.