नागपूर : गर्भवती असलेल्या बहिणीच्या देखभालीसाठी जात असलेली एक महिला धावत्या रेल्वेगाडीत चढताना गंभीर जखमी झाली. ही घटना सकाळी ११.१० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक दोनवर घडली. दरम्यान मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान दुपारी १ वाजता या महिलेचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिच्या दोन्ही मुलांनी एकच टाहो फोडला.
सविता राणी चंदन कुमार मेहता (३४) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. ती प्रयागराज येथे राहते. तिची बहीण काजीपेठला राहते. बहीण गर्भवती असल्यामुळे तिच्या देखभालीसाठी ती ०२७९२ दानापूर-सिकंदराबाद विशेष रेल्वेगाडीने काजीपेठला जात होती. तिच्या सोबत एक १० वर्षाचा, एक ७ वर्षांचा मुलगा आणि १८ वर्षांचा भाऊ होते. ते कोच क्रमांक एस ८, बर्थ क्रमांक १७, १८ वरून प्रवास करीत होते. नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक दोनवर दानापूर-सिकंदराबाद ही गाडी सकाळी ११.१० वाजता आली. गाडी थांबल्यानंतर सविता राणी या मुलांसाठी खाद्यपदार्थ घेण्यासाठी गाडीखाली उतरल्या. खाद्यपदार्थ विकत घेत असताना त्यांना वेळ लागला. तेवढ्यात गाडी पुढील प्रवासाला निघाली. काही प्रवासी धावत्या गाडीत चढले. सविता राणीसुद्धा धावत्या रेल्वेगाडीत चढत असताना त्यांचा तोल जाऊन त्या प्लॅटफार्मवर जोरात आदळल्या. यात त्यांच्या छाती, खांदा आणि कंबरेला मुका मार लागला. लगेच त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु दुपारी १ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास नारायण रेड्डी करीत आहेत.
...............
मुलांच्या आनंदावर पडले विरजण
मावशीच्या घरी जायचे असल्यामुळे सविता राणी यांची दोन्ही मुले आनंदात होती. मावशीच्या घरी जाऊन खूप मजा करू असे त्यांनी ठरविले होते. परंतु नियतीला ते मान्य नव्हते. मावशीच्या घरी जाण्यापूर्वी या बालकांच्या आईला काळाने हिरावले. आईच्या मृत्यूची बातमी कळताच दोन्ही मुले ओक्साबोक्सी रडत होते. ते पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले.
.............