नागपूर: शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली होत असलेल्या व वर्षाच्या सुरुवातीला उघडकीस आलेल्या कोट्यवधींच्या फसवणूकीच्या रॅकेटमध्ये पोलिसांना मोठे यश हाती लागले आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी अद्यापही फरार असले तरी वर्ध्यातील एका महिला डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून डॉक्टर असलेला तिचा पतीदेखील आरोपी आहे. नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
डॉ.प्रिती निलेश राऊत असे अटक करण्यात आलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. विराज सुहास पाटील (दहीसर, मुंबई) हा या रॅकेटचा सूत्रधार आहे. कोलकाता ईडीने पाटील याच्यावर पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ईडीने अटक केल्यापासून पाटील कोलकाता तुरुंगात आहेत. वर्धा येथील सूरज सावरकर याच्या मदतीने त्याने नाइन ॲकॅडमी प्रा. लि. नावाची कंपनी सुरू केली होती. प्रीती आणि तिचा पती डॉ.निलेश यांच्यासोबत सुरेंद्र मधुकरराव सावरकर (सेलू, वर्धा), प्रियंका खन्ना (जालंधर, पंजाब), पी.आर.ट्रेडर्सचा प्रिंन्सकुमार, एम आर ट्रेडर्सचा राकेश कुमार सिंग, टी.एम ट्रेडर्सचा अमन ठाकुर, आर. के. ट्रेडर्सचा राहुल कुमार अकेला व ठाण्यातील मिलन एन्टरप्रायझेस तसेच कोलकात्यातील ग्रीनव्हॅली ॲग्रो यांचे प्रोप्रायटर या प्रकरणात आरोपी आहेत.
या कंपनीच्या माध्यमातून शेअर मार्केट, क्रिप्टो करंसी याबाबत प्रशिक्षण देण्याची बतावणी करण्यात यायची. नागरिकांना जाळ्यात ओढून ५ ते १५ टक्के नफ्याचे आमिष दाखवत ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सांगितले जायचे. डॉ.प्रिती व तिचा पती डॉ.निलेश यांनी वर्ध्यातील मोठ्या हॉटेल्समध्ये सेमिनार आयोजित केले होते व त्यानंतर त्यांच्या बोलण्याला फसून लोकांनी गुंतवणूक केली होती. सावरकरच्या सांगण्यावरून नागपुरातील व्यापारी विक्रम बजाज यांच्यासह अनेकांनी टी.पी. वेबसाइटवर ग्लोबल, एफएक्समध्ये गुंतवणूक केली. आरोपींनी गुंतवणुकदारांना त्यांच्या डमी फर्मच्या बँक खात्यात पैसे टाकण्यास सांगितले.
सुरुवातीचा नफा मिळाल्यानंतर पीडितांनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. नंतर, गुंतवणूकदारांनी संकेतस्थळावरून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश मिळाले नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या गुंतवणूकदारांची १.२१ कोटींची फसवणूक झाली होती. तपासात हा आकडा २.५९ कोटींवर गेला. बजाज यांच्या तक्रारीवरून आर्थिक शाखेने फसवणूक आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. डॉ प्रीती वर्ध्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथून तिला ताब्यात घेतले. तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिच्या चौकशीतून अनेक नवीन लिंक्स समोर येऊ शकतात.