कळमेश्वर (नागपूर) : पतीसाेबत माेटारसायकलीने जात असताना धावत्या दुचाकीच्या मागील चाकात साडीचा पदर अडकला. त्यात राेडवर पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गाेंडखैरी शिवारात नुकतीच घडली.
प्रीती पाेचूल शिंदे (२२, रा. गंगानगर, काटाेल राेड, नागपूर), असे मृत महिलेचे नाव आहे. ती पती पाेचूल बाबूराव शिंदे (२८) यांच्यासाेबत एमएच-३१/बीआर-४६७४ क्रमांकाच्या माेटारसायकलने अमरावती- नागपूर महामार्गाने गावी जात हाेती. दरम्यान, गाेंडखैरी शिवारात धावत्या दुचाकीच्या मागील चाकात तिच्या साडीचा पदर अडकला आणि ती दुचाकीवरून राेडवर पडली. यात तिच्या डाेक्याला गंभीररीत्या दुखापत झाली.
लगेच तिला नागपूर येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये व तेथून मेडिकल रुग्णालयाच्या ट्रामा सेंटरमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान मंगळवारी (दि.३०) सकाळी ८.५२ वाजेच्या सुमारास डाॅक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घाेषित केले. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, घटनेचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक माेरेश्वर नागपुरे करीत आहेत.