नागपूर : बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शेतजमीन बळकावली आहे व पोलीस त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल एका याचिकेत करण्यात आला आहे.
रिटा म्हैसकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. मोटाळा तालुक्यातील राजूर येथे म्हैसकर यांची दीड एकर शेतजमीन आहे. आमदार गायकवाड यांनी २१ जुलै २०२१ रोजी त्या जमिनीवर अतिक्रमण केले. जमिनीवरील कुंपण काढले व तेथे फार्म हाऊस बांधले. जमिनीतील मुरुम काढून तो लाखो रुपयात विकला. म्हैसकर यांनी यावर आक्षेप घेतला असता, त्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली, तसेच ही जमीन अत्यंत कमी किमतीत विकण्यासाठी दबाव वाढविण्यात आला. म्हैसकर यांनी यासंदर्भात १२ ऑगस्ट २०२१ रोजी बोरखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, पण पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. सरकार व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही गायकवाड यांना पाठीशी घातले, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण(सीबीआय)कडे हस्तांतरित करण्याची विनंती म्हैसकर यांनी न्यायालयाला केली आहे.
राज्य सरकारला नोटीस
या प्रकरणावर शुक्रवारी न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकेतील गंभीर आरोप लक्षात घेता, राज्य सरकारला नोटीस बजावून यावर चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्तीतर्फे ॲड. ईशान सहस्रबुद्धे व ॲड. स्नेहलता दातार यांनी कामकाज पाहिले.