लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विशाखापट्टनम पोलिसांनी देवनगर, सावरकरनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेतले. आर्थिक व्यवहारातून मंगळवारी नागपूर पोलिसांच्या मदतीने विशाखापट्टनम पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते. या संबंधाने रात्रीपर्यंत शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवनगर-सावरकरनगर परिरसरात राहणाऱ्या या महिलेवर एका आर्थिक व्यवहाराच्या प्रकरणात कोर्टाकडून वारंवार वॉरंट बजावण्यात येत होते. मात्र, तिच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कोर्टातून या महिलेवर अजामिनपात्र वॉरंट काढण्यात आला. त्यानुसार, विशाखापट्टनम पोलीस आज हा एनबीडब्ल्यू वाॅरंट घेऊन नागपुरात पोहचले. सोबत त्यांनी येथील वरिष्ठांच्या नावे एक गोपनीय पत्रही आणले. हे पत्र वरिष्ठांपुढे येताच त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश जारी केले. त्यानुसार, परिमंडळ दोनच्या स्कॉडसह धंतोलीतील एका प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील पोलीस पथक महिलेच्या घरी पोहचले. त्यांनी तिच्यावरील अजामिनपात्र वॉरंट तामिळ केला आणि तिला ताब्यात घेतले.
या महिलेला पोलीस पथक विशाखापट्टनमकडे घेऊन गेल्याचे समजते. दरम्यान, या संबंधाने रात्रीपर्यंत उलटसुलट चर्चा सुरू होती. सदर महिलेने एका निवृत्त अधिकाऱ्याचे घर बळकावल्याचाही आरोप होता. दुसऱ्या एका व्यवहारात या महिलेने मोठ्या रकमेचा चेक संबंधितांना दिला आणि खात्यात रक्कम नसल्याने तो बाऊन्स झाल्यानंतर कारवाई टाळण्यासाठी बराच आटापिटा केल्याने या महिलेवर विशाखापट्टनम पोलिसांनी नागपूर पोलिसांच्या मदतीने कारवाई केल्याची चर्चा होती.
विशेष म्हणजे, महिलेला विशाखापट्टनम पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या आणि सोबत नेल्याच्या कारवाईच्या वृत्ताला धंतोली पोलीस आणि झोन दोन पथकाकडून दुजोरा मिळाला. मात्र, या संबंधाने सविस्तर माहिती देण्यास असमर्थता दर्शविली.