नागपूर : मेडिकलच्या द्वारावर ऑटोरिक्षात महिलेला प्रसूती वेदना सुरू झाली. डॉक्टर आणि परिचारिकेने प्रसंगावधान राखून ऑटोतच प्रसूती केली. तातडीने उपचार मिळाल्याने माता व बाळ दोघेही सुरक्षित आहे.
मेडिकलच्या आकस्मिक विभागाच्या द्वाराजवळ ऑटोमध्ये प्रसूती होत असल्याची माहिती सुरक्षा रक्षकाने डॉक्टरला दिली. कोणताही वेळ न दवडता सेवेवरील डॉक्टर आणि वंदना भोयर आणि झुल्फी अली हे कर्मचारी डिलिव्हरी ट्रे आणि उरलेले सामान घेऊन धावत ऑटोकडे पोहोचले. सर्वांनी सामूहिक प्रयत्नाने काळजीपूर्वक ऑटोतच प्रसूती करून घेतली.
प्रसूतीनंतर बाळाला औषधशास्त्र विभागातील आकस्मिक विभागात बालरोगतज्ज्ञांना दाखविण्यात आले. बाळ सुरक्षित असल्याचे पुढे आल्यावर आई- बाळ दोघांना येथील स्त्रीरोग विभागाच्या वॉर्डात पाठवण्यात आले. मेडिकलच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच काळजी घेऊन आई-बळाला वाचवल्याने नातेवाईकांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले. या कठीण प्रसूतीसाठी वर्षा बडकी, हेमा बोपचे, श्रद्धा धारगावे यांचेही परिश्रम महत्वाचे होते.