नागपूर : पार्सलवर चुकीचा पिनकोड टाकल्याची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीला ‘ऑनलाइन’ माध्यमातून पाच रुपये पाठविणे एका महिला उद्योजिकेला महागात पडले. अज्ञात आरोपींनी बॅंक खात्यातून ४३ हजार रुपये लंपास केले. यासंदर्भात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वंदना रमेश मालू (४४, देशपांडे ले-आऊट, वर्धमाननगर) यांना दि. ९ ते २६ जानेवारी दरम्यान ८९७६९३८४०४ या क्रमांकावरून फोन आला व त्यांनी पाठविलेल्या एका पार्सलवरील पिनकोड चुकल्याचे सांगितले. संबंधित व्यक्तीने मालू यांना एक लिंक पाठविली व त्यावर पाच रुपये पाठविण्यास सांगितले.
मालू यांनी त्याप्रमाणे लिंकवर क्लिक करून संबंधिताला पाच रुपये पाठविले. काही वेळातच त्यांच्या बॅंक खात्यातून ४३ हजार ९३२ रुपये दुसऱ्या खात्यात वळते झाले. यासंदर्भात मालू यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून अज्ञात आरोपीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.