..........
फ्लॅटच्या पैशांची केली अफरातफर
नागपूर : फ्लॅटच्या पैशांची अफरातफर करणाऱ्या महिलेविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी कुणाल प्रशांत दशोत्तर (४०) रा. बडकस चौक, अयाचित मंदिर रोड, महाल यांचे सासरे मधुसूदन शंकरनाथ नागर (६६) व सासू मीनाक्षी मधुसूदन नागर (६२) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पारधीनगरात एक फ्लॅट खरेदी केला. फ्लॅटचे काही पैसे देणे झाले होते. परंतु रजनी नरेंद्र पांडे (४९) रा. कोतवालनगर हिने फिर्यादीच्या सासू-सासऱ्यांना विश्वासात घेऊन फ्लॅटचे उर्वरित १२.५० लाख रुपये कंपनीच्या खात्यात टाकले नाही. ही रक्कम तिने आरोपी हरीश तिवारी याच्या खात्यात टाकून त्यांचा विश्वासघात केला. दरम्यान, कुणाल दशोत्तर यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
...........
बेकायदेशीर ले-आऊट टाकून फसवणूक
नागपूर : बेकायदेशीर ले-आऊट टाकून एका व्यक्तीची १०.८५ लाखाने फसवणूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध पारडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कमला दयाकिशन अग्रवाल (७०) रा. छापरूनगर यांना माही लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर कार्यालय एचबी टाऊन जुना पारडी नाका येथे आरोपी संजय रामदास चोरे, सीमा संजय चोरे रा. आसोली यांनी चंद्रभान देशमुख यांच्यासोबत शेतीचा करारनामा करून प्लॉटचे अॅग्रीमेंट करून दिले. आरोपींनी शेतजमिनीची सेलडीड देण्याचे आमिष दिले होते. परंतु सेलडीड करून दिली नाही. त्यामुळे फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
..........
ट्रकमधील साहित्याची चोरी
नागपूर : ट्रकमधील सामान खाली करताना अज्ञात आरोपीने २ लाख ५३ हजार ९०९ रुपये किमतीच्या ३४ वस्तूंची चोरी केल्याची घटना सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. गोपाल अशोक ओझलवार (३४) रा. फ्लॅट नं. ४०३, सिद्धिविनायक महिला तलोजा फेज २ कोयनावेले पनवेल रायगड हे अॅमेझॉनमध्ये असिस्टंट लीगल मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. ११ जुलैच्या दुपारी १.१९ ते १२ जुलैच्या सायंकाळी ५.२६ दरम्यान ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस प्रा.लि. गुडगाव हरियाणा येथून ट्रक क्रमांक पी.बी. ६५, ए.एस-१४८३ चा चालक आरिफ खान मसूम अली खान (२८) रा. कमाल, भरतपूर राजस्थान याने कंटेनरमध्ये मोबाईल, घड्याळ, बूट, पेनसेट, हेडफोन, गॉगल व इतर वस्तू असा एकूण ३,०४८ नग वस्तू लोड करून आणल्या होत्या. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत टीसीआय सप्लाय, चेन सोल्युशन प्लॉट नं. ३, मिहान सेज खापरी गावाजवळ ट्रकमधील वस्तू खाली करीत असताना ३४ वस्तू अज्ञात आरोपीने चोरून नेल्या. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
..............