नागपूर : पतीच्या निधनानंतर एकाकी झालेल्या महिलेने दुसरा घरठाव करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रियकरासाठी पोटच्या दोन मुलींना वाऱ्यावर सोडून ती प्रियकराच्या घरी गेली. मात्र, त्याच्या घरच्यांनी तिला झिडकारले. त्यामुळे ती हिरमुसली होऊन परतली. आता तिच्यातील आई जागी झाली असून, आपल्या चिमुकल्या कुशीत याव्यात म्हणून तिची धावपळ सुरू झाली आहे.
२६ मे रोजीच्या पहाटे १.३० वाजता दीड वर्षांची पिंकी तसेच तीन वर्षांची कीर्ती येथील मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर सैरभैर अवस्थेत चाईल्ड लाईनच्या सदस्यांना दिसल्या होत्या. सदस्यांनी त्यांच्या जवळ जाऊन आईवडिलांबाबत विचारणा केली असता, त्या व्यवस्थित माहिती देऊ शकल्या नाही. त्यामुळे चाईल्ड लाईनच्या सदस्यांनी त्यांना लोहमार्ग पोलीस ठाण्यात (जीआरपी) नेले.
पोलिसांनी रेल्वेस्थानक परिसर आणि फलाटावर या दोन मुलींच्या पालकांना शोधण्याचा प्रयत्न केला. नंतर फलाटावरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यात एक महिला या दोन मुलींना फलाटावर सोडून निघून गेल्याचे दिसून आले. ही महिला कोण, कुठली आणि ती कुठे आहे, ते स्पष्ट न झाल्यामुळे पोलिसांनी या दोन मुलींना श्रद्धानंदपेठेतील खासगी बालगृहात दाखल केले.
आता या घटनेला सात दिवस झाले असताना, सीसीटीव्हीत दिसणारी महिला रेल्वे पोलिसांकडे पोहोचली. आपल्या मुली कुठे आहेत, अशी विचारणा करणाऱ्या या महिलेची पोलिसांनी चाैकशी केली असता, ती पश्चातापाने रडू लागली. मूळची गोरखपूर(उत्तर प्रदेश)ची असलेल्या या महिलेचा नवरा वर्षभरापूर्वी मरण पावला. मोलमजुरी करून दोन मुलींसह स्वत:चे पोट भरणाऱ्या या एकाकी महिलेचे सोबत काम करणाऱ्या मजुराशी सूत जुळले. हे दोघे नागपूरला पळून आले. त्यांनी दुसरा घरठाव करण्याचा निर्णय घेतला. त्याने तिला स्वत:च्या घरी नेण्याचीही तयारी दर्शविली. मात्र, दोन मुलींना घरचे स्वीकारणार नाही, असेही सांगितले.
दुसऱ्या घरठावाच्या स्वप्नाने हुरळून गेलेल्या या महिलेची मती बिघडली. तिने आपल्या दोन्ही चिमुकल्यांना बेवारस सोडण्याचा निर्णय घेतला अन् त्यानुसार २६ मेच्या रात्री तिने रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर मुलींना झोपू घातले आणि प्रियकरासोबत पळ काढला. ती त्याच्या घरी पोहोचली. मात्र, ती दोन मुलींची आई असल्याचे कळताच त्याच्या घरच्यांनी तिला हुसकावून लावले. या घडामोडीमुळे तिच्या मातृत्वाने उसळी मारली. ती रेल्वे पोलिसांकडे पोहोचली अन् आपल्या मुलींची मागणी करू लागली. पोलिसांनी तिला कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या.
बालकल्याण समितीकडे निर्णय
मुली पोलिसांकडून बालगृहात दाखल करण्यात आल्या. त्यामुळे त्यांचा ताबा आता सदर महिलेला बालकल्याण समितीच्या निर्णयानुसार मिळणार आहे. परिणामी, सदर महिला आपल्या गावाकडे परत गेली आहे. मुली कधी मिळणार, हे स्पष्ट झाले नाही.