लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरटीओ कार्यालयातील लर्निंग लायसन्स घोटाळयाप्रकरणी अटकेतील महिला अधिकारी संजिवनी चोपडे यांच्याकडून अधिक माहिती काढण्यात पोलीस असमर्थ ठरले. चौकशीदरम्यान या अधिकाऱ्याने आपण निर्दोष असल्याचे वारंवार संगितले. यामुळे पोलिसांना कोणतीही माहिती मिळू शकली नाही. याच दरम्यान न्यायालयाने बुधवारी त्यांनी जामिनावर सुटका केली.आर्थिक शाखा पोलिसांनी ४ नोव्हेंबरला त्यांना अटक केली होती. संजीवनी चोपडे या शहर विभागात सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आहेत. शहर आरटीओच्या माध्यमातून ५०८ बोगस शिकावू परवाने देण्यात आले. एक महिन्यापूर्वी सीताबर्डी पोलीस ठाण्यामध्ये ठगबाजीचे प्रकरण दाखल झाले होते. याचा तपास आर्थिक शाखा करत आहे. आरटीओचे अधिकारी सारथी अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन कामकाज करतात. त्यांना सारथी अॅपची लॉग इन आयडी देण्यात आली आहे. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या काळात ५०८ लर्निंग लायसन्स देण्यात आले होते. त्यापैकी २४२ लर्निंग लायसन्स संजीवनी चोपडे यांच्या लॉग इन आईडीवरून देण्यात आले होते. या संदर्भात चौकशी करण्यासाठी संजीवनी यांना अटक करण्यात आली होती.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान संजीवनी यांनी पोलिसांच्या प्रत्येक प्रश्नांपासून स्वत:चा बचाव करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आपल्या पासवर्डची चोरी करून कोणीतरी हा घोटाळा केला आहे, हेच त्यांचे म्हणणे होते. पासवर्ड चोरी कसा होऊ शकतो, या प्रश्नाभोवती चौकशी चालली असताना त्यांनी ‘पासवर्ड हॅक’ झाल्याचे सांगितले. अपॉयटमेंटची तारीख बदलणे हे आपल्या अधिकारक्षेत्रात नाही. सर्व लर्निंग लायसन्स परिवहन कार्यालयाच्या बाहेरून देण्यात आले होते. कार्यालयाबाहेरून देण्यात आलेल्या लर्निंग लायसन्सला आपण जबाबदार नसल्याचे त्यांनी सांगितले. चोपडे या महिला अधिकारी असल्याने पोलिसांनी चौकशी सामान्यपणे केली. यामुळे संजिवनी यांच्याकडून घोटाळ्याशी संबंधित अधिकची माहिती मिळू शकली नसल्याचे सांगण्यात येते.पोलीस कोठडी संपल्यावर बुधवारी संजिवनी यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केल्यावर त्यांची जामानावर सुटका करण्यात आली. या घोटाळ्यात १३ जणांना आरोपी बनविण्यात आले आहे. फक्त चार आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत. संजिवनी यांच्या सुटकेनंतर अन्य आरोपींच्या अटकेची शक्यता वर्तविली जात आहे. न्यायालयात चोपडे यांच्यातर्फे अॅड. समीर सोनवने यांनी बाजू मांडली.