नागपूर : स्कूल बसवर कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेची अज्ञात आरोपीने हत्या केली. हातपाय बांधून प्लॅस्टिकच्या मोठ्या पन्नीत तिचा मृतदेह गुंडाळून निर्जन ठिकाणी फेकून दिला. रविवारी सकाळी कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली. तेव्हापासून परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
दीपा जुगल दास (४१) असे मृत महिलेचे नाव आहे. ती समर्थनगरात राहत होती. तिचा पती स्टील कंपनीत काम करतो. तिला एक मुलगा आणि मुलगी आहे. जैन स्कूलच्या बसवर कंडक्टर म्हणून कार्यरत असलेली दीपा नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी कर्तव्यावर गेली. नंतर बेपत्ता झाली. रात्र झाली तरी ती परत आली नाही. त्यामुळे घरच्यांनी तिच्या मोबाइलवर संपर्क केला. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. येईल परत, असे समजून तिचे कुटुंबीय झोपी गेले.
रविवारी सकाळी ८.३० च्या सुमारास कपिलनगरातील एसडीपीएल सोसायटी, उप्पलवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्लॅस्टिकमध्ये मृतदेह गुंडाळून असल्याचे काही जणांना दिसले. ही माहिती कळताच कपिलनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पन्नीत एका महिलेचा मृतदेह होता. हातपाय बांधलेले होते. मृत महिला स्कूल बसच्या वाहकाला असलेला गणवेश घालून होती. त्यामुळे तिची ओळख पटविणे सोपे गेले. शनिवारी दुपारपासून बेपत्ता झालेल्या दीपा दासचा तो मृतदेह असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
गळा आवळून हत्या
दीपाची हत्या गळा आवळून करण्यात आल्याचे मत डॉक्टरांनी प्राथमिक अहवालात नोंदवले आहे. तिला ठार मारल्यानंतर तिच्या मृतदेहाचे हातपाय बांधून तो पन्नीत गुंडाळून फेकल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तिच्यावर जबरदस्ती किंवा बलात्कार झाल्याचा संशय होता. मात्र, डॉक्टरांनी तसे काही झाल्याचे अधोरेखित केले नाही. त्यामुळे दीपाची हत्या कुणी आणि कोणत्या कारणासाठी केली, असा प्रश्न आहे.
श्वान नुसतेच घुटमळले
दीपाची हत्या दुसरीकडे झाली असावी आणि तिचा मृतदेह तेथे आणून फेकला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. एखाद्या वाहनातून मध्यरात्रीनंतर तिचा मृतदेह आणून फेकून देण्यात आला असावा, असेही पोलिसांचे मत आहे. त्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले होते. मात्र, श्वानाकडून फारशी काही मदत होऊ शकली नाही. काही अंतरापर्यंत जाऊन श्वान घुटमळले आणि परत आले.
बसचालकाने उतरून दिले अन् ...
दीपा शनिवारी स्कूल बसवर गेली होती. तिला बसचालकाने दुपारी २ वाजेच्या सुमारास कुशीनगरात उतरवून दिले. तेथून ती एका महिलेच्या घरी गेली. तेथून १० मिनिटानंतर निघाली अन् नंतर बेपत्ता झाली. तिची हत्या कुणी केली, ते शोधून काढण्यासाठी पोलिसांनी तिच्याशी संबंधित एका मित्राची चौकशी केली. मात्र, रात्रीपर्यंत त्याच्याकडून काही स्पष्ट होऊ शकले नाही. दीपाच्या हत्येला अनैतिक संबंधाची आणि उधारीच्या पैशाची किनार असल्याची चर्चा आहे.