नागपूर : पोलीस कर्मचारी असल्याचे सांगून दागिने पळविणाऱ्या महिलेस पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. या महिलेकडून इतर घटनांची माहिती समोर येऊ शकते. सरिता अमोल डोंगरे (२१, रा. सातगाव, हिंगणा) असे या महिला आरोपीचे नाव आहे.
रागिणी गोपाळ रावळकर (२२) या भांडेवाडीत राहतात. मंगळवारी दुपारी १२ वाजता सरिता रागिणीच्या घरी आली. आपण पोलीस कर्मचारी असल्याचे सांगून चार कोटींची अफरातफर झाली असून तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याचे सांगितले. आरोपी पकडले गेले असून त्यांना न्यायालयात सादर करायचे आहे. तुमची चौकशी करायची असून, दागिने सोबत घेऊन न्यायालयात चला असे तिने सांगितले. रागिणी यांनी, माझा या प्रकरणाशी काही संबंध नसून पैसेही आपल्या खात्यात जमा झाले नसल्याचे सांगितले. त्यानंतर सरिता रागिणीवर सोबत येण्यासाठी दबाव टाकू लागली. रागिणीने याची माहिती आपल्या आईवडिलांना दिली. सरिताने रागिणीच्या आईवडिलांना दागिने घेऊन न्यायालयात जायचे असल्याचे सांगून काही वेळातच परत येऊ अशी माहिती दिली. सरिताने दबाव टाकल्यामुळे रागिणीचे आईवडील काहीच बोलू शकले नाहीत. सरिता रागिणीला घेऊन जिल्हा न्यायालय परिसरात पोहोचली. तेथे तिने दागिन्यांची पिशवी घेऊन न्यायालयात जाऊन येतो असे सांगितले. तिच्या वागणुकीमुळे रागिणीला शंका आली. तिने सरिताला दागिन्यांची पिशवी परत करण्यास सांगितले. पिशवी न दिल्यास पोलिसांत तक्रार देण्याची धमकी देताच सरिताने पिशवी परत केली. दरम्यान, रागिणीने न्यायालयात तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना ही घटना सांगितली. त्यांनी सरिताला पकडून सदर पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर पोलिसांनी हे प्रकरण वाठोडा पोलिसांकडे सोपविले. तपासानंतर निरीक्षक आशालता खापरे यांनी गुन्हा दाखल करून सरिताला अटक केली.
....................
वागणुकीमुळे कुटुंबीय त्रस्त
सरिताचा पती नोकरी करतो. चांगल्या कुटुंबातील असूनही तिला चोरी आणि फसवणूक करण्याची सवय लागली. यामुळे तिचे कुटुंबीयही त्रस्त आहेत. गर्भवती असूनही बुटीबोरीवरून भांडेवाडीला जाऊन फसवणूक केल्यामुळे पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत.
...............