नागपूर : आजारी पत्नीला कंटाळून एका पतीने थेट तिचा काटा काढण्यासाठी गळा चिरून तिची हत्याच केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. १४ नोव्हेंबर रोजी एका महिलेचा मृतदेह नवीन गुमगाव येथील शेतात सापडला होता. त्याच्या तपासादरम्यान तिच्या पतीनेच तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. सावित्री पटले असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिचा पती देवराम (४७) याच्यासह त्याचे सहकारी राजू चौधरी (४४, बालाघाट) व मुन्ना ऊर्फ मुनीर शेख (५१, मकरधोकडा) यांना अटक केली आहे.
१४ नोव्हेंबर रोजी सकाळी नवीन गुमगाव येथील शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. हिंगणा पोलिस ठाण्यात हत्येच्या गुन्ह्याची नोंद झाली होती व पोलिसांकडून महिलेच्या नातेवाइकांचा शोध सुरू होता. सावित्रीच्या पतीने कुटुंबीयांच्या दबावानंतर बुटीबोरी पोलिस ठाण्यात ती हरविल्याची तक्रार दाखल केली होती. बुटीबोरी पोलिस ठाण्यातून ती माहिती इतर पोलिस ठाण्यांना देण्यात आली.
हिंगणा पोलिस ठाण्यातील पथकाला तो मृतदेह सावित्रीचा असल्याचा संशय आला. पोलिसांनी नातेवाइकांना बोलावून मृतदेहाची ओळख पटविली. पोलिसांसमोर देवरामने मोठा धक्का बसल्याचा ड्रामादेखील केला. तपासादरम्यान सावित्रीचे देवरामसोबतचे संबंध बिघडल्याचे हिंगणा पोलिसांना आढळून आले. त्यांनी चौकशी करताच देवराम गायब झाला. त्यामुळे संशय अधिकच बळावला. सोमवारी रात्री गोंदियातून देवरामला पकडण्यात आले. त्याने राजू चौधरी आणि मुन्ना शेख यांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. यानंतर मुन्ना आणि राजूलाही अटक करण्यात आली.
२० वर्षांअगोदर झाला होता विवाह
हत्येचा मुख्य सूत्रधार देवराम हा मूळचा गोंदियाचा रहिवासी आहे. २० वर्षांपूर्वी त्याचा विवाह ४२ वर्षीय सावित्रीशी झाला होता. दोघांना १७ वर्षांची मुलगी आणि १६ वर्षांचा मुलगा आहे. देवराम हा मजूर म्हणून काम करतो. अडीच महिन्यांपूर्वी तो पत्नी सावित्री हिच्यासह नागपुरात मोलमजुरी करण्यासाठी आला होता. तेव्हापासून दोघेही बुटीबोरी येथे राहत होते. सावित्री अनेक महिन्यांपासून मानसिक आजाराने त्रस्त होती. ती स्वयंपाक किंवा घरातील इतर कामेही करत नसे. शिवीगाळ करणे किंवा झाडावरची फुले तोडणे यासारख्या किरकोळ गोष्टींवरूनही सावित्रीचे शेजाऱ्यांशी वाद व्हायचे. या वागण्याने देवराम कंटाळला होता. त्याने तिला संपविण्याचा निर्णय घेतला. त्याने दोनदा तसा प्रयत्नदेखील केला. हत्येतील इतर दोन आरोपींसोबत देवराम काम करतो. त्याने आपल्या दोन्ही साथीदारांना पत्नीपासून मुक्ती मिळण्यास मदत करण्यास सांगितले. दोन्ही आरोपींनी होकार दिला.
दुचाकीने निघाले आणि पत्नीला संपविले
ठरलेल्या प्लॅननुसार १३ नोव्हेंबर रोजी देवराम नातेवाइकांना गावी जाऊन भेटण्याच्या बहाण्याने सावित्रीला दुचाकीने घेऊन निघाला. राजू चौधरी आणि मुन्ना शेख हेही दुसऱ्या दुचाकीवर होते. आरोपी सावित्रीला घेऊन हिंगणा येथील घटनास्थळी पोहोचले. तेथे ब्लेडने सावित्रीचा गळा चिरून खून केल्यानंतर देवराम साथीदारांसह फरार झाला. देवरामने सावित्रीच्या घरच्यांना बोलावून ती जेवण करून अचानक गायब झाल्याचे सांगितले. कुटुंबीयांनी त्याला पोलिसांत तक्रार देण्यास सांगितल्यावर देवरामने टाळाटाळ सुरू केली. त्याने सावित्रीचा शोध घेण्याचे नाटक केले.