लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एक लाखाची सुपारी देऊन एका तरुणाचा खुनाचा आरोप असलेल्या एका महिलेचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. पी. गायकवाड यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. जया अरुण शर्मा (४०) रा. चांदमारी वाठोडा, असे आरोपी महिलेचे नाव आहे. लिकेश विजय साठवणे (२५), असे मृताचे नाव होते. तो पवनशक्तीनगर येथील रहिवासी होता. ९ एप्रिल २०१७ पासून लिकेश हा बेपत्ता झाला होता. या घटनेच्या दोन-अडीच महिन्यापूर्वी मोबाईलवर झालेल्या संभाषणावरून लिकेशचे जयासोबत भांडण झाले होते. लिकेशने तिला मारहाणही केली होती. या घटनेचा सूड म्हणून जयाने गोपाल ऊर्फ प्रेमसिंग ज्वालासिंग बिसेन (२५) रा. पवनशक्तीनगर याला लिकेशचा खून करण्यासाठी एक लाखाची सुपारी दिली होती. गोपालने आपला मित्र प्रफुल्ल गेडाम याच्या मदतीने लिकेशचे अपहरण केले होते. त्याच्यावर चाकूने वार करून आणि दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह गिड्डोबानगरजवळील मोकळ्या मैदानातील विहिरीत टाकला होता. नंदनवन पोलिसांनी अपहरण, खून आणि पुरावा नष्ट करण्याबाबत गुन्हा दाखल करून, या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली होती. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील रश्मी खापर्डे यांनी काम पाहिले. पोलीस उपनिरीक्षक एन. पी. मोहोड हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत.
खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेचा जामीन फेटाळला
By admin | Published: July 02, 2017 2:39 AM