लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत हिवरीनगर येथे अमी जोशी ही महिला आणि नागपूर मेट्रोचे काम करीत असताना एकूण सहा कर्मचारी जखमी झाले आहेत. नागपूर आणि पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामावर आतापर्यंत २९३६ कोटी १३ लाख रुपये खर्च झाला असून केंद्र व राज्य शासनाकडून एकूण ३,०९८ कोटी ६३ लाख रुपये अनुदान स्वरुपात प्राप्त झाल्याची बाब माहिती अधिकारांतर्गत उघड झाली आहे.माहिती अधिकारांतर्गत अभय कोलारकर यांनी महामेट्रोकडे अनेक प्रश्न विचारले असून त्या प्रश्नांची उत्तरे महामेट्रोने दिली आहेत.अमी जोशी स्वत:चे वाहन चालवित असताना महामेट्रोच्या कामामुळे जखमी झाल्याने त्यांचा वैद्यकीय खर्च ५.०२ लाख रुपये देण्यात आला. शिवाय जखमी कामगारांचा खर्च त्या त्या कंत्राटदारांकडून करण्यात आला आहे. महामेट्रोचे स्वत:चे एकूण किती कर्मचारी आहेत व त्यांची पदानुसार संख्या किती, या प्रश्नावर महामेट्रोने डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट मेट्रोरेलनागपूर डॉट कॉम या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध असल्याचे उत्तर दिले. मेट्रोने केलेल्या किंवा करण्यात येणाऱ्या नोकरी भरतीमध्ये नागपुरातील लोकांना प्राधान्य देण्यात येत असल्यास त्याची टक्केवारी विचारली. यावर महामेट्रोच्या नागपूर येथील कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांमध्ये नागपुरातील व्यक्तींचादेखील पदनिहाय समावेश असल्याचे सांगितले आहे.महामेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. नागपूरचे एकमेव प्रशासकीय कार्यालय मेट्रो भवन म्हणून काचीपुरा, रामदासपेठ येथे बनविण्यात येत असल्याचे सांगितले आहे. मेट्रोतून प्रवास करताना अपघात झाल्यास प्रवाशांसाठी अपघात विमा काढण्यात येणार आहे का, या प्रश्नावर महामेट्रोने सद्यस्थितीत कोणतीही योजना नसल्याचे थेट उत्तर दिले आहे.३१ मार्च २०१८ पर्यंत मेट्रोला सरकारकडून एकूण किती अनुदान मिळाले व एकूण खर्च किती झाला, असा प्रश्न अभय कोलारकर यांनी विचारला होता. त्यावर महामेट्रोने नागपूर आणि पुणे प्रकल्पावर २९३६.१३ कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे सांगितले आहे. त्यात नागपूर मेट्रोकरिता केंद्र सरकारकडून २०३७.९७ कोटी आणि राज्य शासनाकडून ४६०.६६ कोटी अर्थात एकूण २,४९८.६३ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले असून सर्व अनुदान खर्च झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर पुणे मेट्रोकरिता केंद्र शासनाकडून ५१० कोटी आणि राज्य शासनाकडून ९० कोटी रुपये अनुदान मिळाले असून अनुक्रमे ३८७.५० कोटी आणि ५० कोटी रुपये खर्च झाले आहे.बांधकाम काळात कॉर्पोरेशन व संस्थांना एकूण नुकसान भरपाई किती देण्यात आली आणि त्याची एकूण रकमेत माहिती कोलारकर यांनी विचारली होती. पण त्यावर महामेट्रोने नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही, असे उत्तर दिले.