डबाबंद कारभाराचे वास्तव : दलालाशी वाद झाल्याने उघडे पडले पितळजगदीश जोशी नागपूरउपराजधानीत दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा डबाबंद कारभार चालतो. यात शेअर आणि वस्तू यांच्या खरेदी विक्रीमध्ये सट्टेबाजी केली जाते. याचे मूळ खोलवर आहे. ते किती खोलवर आहेत, याची माहिती एका महिला उद्योजकाच्या कारभारामुळे उघडकीस आली आहे. या महिला उद्योजकाने एका वर्षात तब्बल २५०० कोटी रुपयांची सौदेबाजी केली. सुरुवातीला नफा कमावणाऱ्या या महिला उद्योजकास नंतर तोटा होऊ लागताच तिने दलालाला परतावा करण्यास नकार दिला. यामुळे हे प्रकरण समोर आले.पश्चिम नागपूर येथील रहिवासी असलेली ही महिला उद्योजक ऊर्जा आणि खनिज उद्योगाशी संबंधित आहे. त्यांच्या कुटुंबीयांचा उद्योग मध्य प्रदेश आणि छत्तीसगडपर्यंत पसरलेला आहे. संबंधित शेअर दलालाशी एका दुसऱ्या महिलेच्या माध्यमातून तिची ओळख झाली. या महिलेने सुद्धा शेअर ट्रेडिंगमध्ये रुची दाखविली. यानंतर तो दलाल या महिला उद्योजकाच्यावतीने खरेदी-विक्री करू लागला. सुरुवातीला दोघांमधील व्यापारी संबंध चांगले राहिले. परतावा सुद्धा वेळेवर झाला. महिला उद्योजकाने मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री केल्याने दलालाला सुद्धा तिच्यावर विश्वास बसला. ती एका प्रतिष्ठित उद्योजक कुटुंबातील सदस्य असल्याने तिला उधार देण्यात दलालाला कुठलाही धोका वाटला नाही. सूत्रानुसार २०१४ मध्ये एका वर्षात या महिलेने जवळपास २५०० कोटी रुपयांची खरेदी विक्री केली. या कालावधीत दलालीचे जवळपास ८ कोटी रुपये महिलेवर थकीत होते.शेअर ट्रेडिंगमध्ये नुकसाननागपूर : शेअर ट्रेडिंगमध्ये नुकसान होत असल्याने महिला उद्योजकाचा मोहभंग झाला. तिने हळूहळू खरेदी विक्री बंद केली. याची माहिती होताच संबंधित दलालाने महिला उद्योजकास आपली थकीत रक्कम परत मागण्यास तगादा लावला. हळूहळू करून थकीत रक्कम परत करण्याचे आश्वासन देत त्याला तिने शांत केले. परंतु वेळ होऊनही महिलेने त्याला पैसे परत केले नाही. त्यामुळे दलाल दु:खी झाला. दलाल आणि महिला उद्योजकाची सामाजिक पार्श्वभूमी एकच असल्याने त्याने प्रतिष्ठित नागरिकांच्या माध्यमातून वाद सोडवण्यास सांगितले. अनेक बैठका झाल्या परंतु कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे दलालाला राग आला. त्यानंतर त्यांच्या संबंधांमध्ये वितुष्ट आले. दलालाचे कर्मचारी वसुलीसाठी थेट महिला उद्योजकाच्या घरी पोहोचले. महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना बोलावून दलालाच्या कर्मचाऱ्यास तुरुंगात धाडले. थकीत रक्कम परत करण्याऐवजी तुरुंगात पाठविल्याने दलाल संतापला. त्याने थकीत रक्कम वसूल करण्यासाठी कंबर कसली. त्याने पोलिसांना खरा प्रकार सांगितला. आता पोलीसही कायदेशीर बाबींवर विचार करीत असून यातून योग्य मार्ग शोधत आहे.(प्रतिनिधी)
महिला उद्योजकाने खेळला २५०० कोटींचा डाव
By admin | Published: January 14, 2016 3:35 AM