लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला बचत गट व महिला उद्योजिका यांच्यासाठी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे. नागपूर शहरात विविध प्रकल्प राबविले जाणार आहेत. यात महिला उद्योजिकांसाठी कमी पैशात जागा उपलब्ध करण्याचा मानस केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केला.महापालिके चा समाजकल्याण विभाग, महिला व बालकल्याण समिती तसेच दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका केंद्राच्यावतीने रेशीमबाग मैदानावर आयोजित महिला बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री अंतर्भूत महिला उद्योजिका मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या, विशेष उपस्थिात खा. रुपा गांगुली, आ. सुधाकर देशमुख, भाजपाचे शहर अध्यक्ष आ. सुधारकर कोहळे, स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, आयुक्त अश्विन मुदगल, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती वर्षा ठाकरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.महिला बचतगटाच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी. त्यांना प्रोत्साहन मिळावे. महिला सक्षम व्हाव्यात यासाठी महापालिकेतर्फे दरवर्षी महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन केले जाते. व्यवसाय वा उद्योगात यशस्वी होण्यासाठी महिला उद्योजिकांनी गुणवत्तेशी तडजोड करू नये. उत्तम दर्जा व मार्केटिंग झाल्यास यश मिळेल. शहरात उत्तम दर्जाची उद्याने, क्रीडा मैदान, स्मशानभूमी व चांगले बाजार उभारणार असल्याचे गडकरी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून हागणदारी मुक्तीसाठी प्रयत्न सुरू आहे. शौचालयामुळे महिलांना सुविधा उपलब्ध होत आहे. यामुळे महिलांना आजार होण्याचे प्रमाण कमी झाल्याची माहिती खा. रुपा गांगुली यांनी दिली. महिला बचतगट व उद्योजिकांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी. यासाठी महापालिकेने दरवर्षी महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन केले जात असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी दिली.प्रस्ताविक वर्षा ठाकरे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी उद्योजिका व महिला बचत गटातील महिलांचा गौरव करण्यात आला.यावेळी सभापती भगवान मेंढे, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या दिव्या धुरडे, वंदना भगत, नगरसेवक सतीश होले,उषा पॅलट, डॉ. रंजना लाडे, झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
कर्तृत्ववान महिला व खेळाडूंचा गौरवउद्योजिका मेळाव्यात कर्तृत्ववान महिलांचा व शहरातील खेळाडूंचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा वाघमारे, महिला क्रिकेट संघातील खेळाडू मोना मेश्राम, कृषी कीटकतज्ज्ञ संगिता सव्वालाखे, बँकिग क्षेत्रातील नीलिमा बावणे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे, स्कूल व्हॅन चालक तनुजा अरबाज खान, अनसूया बचत गटाच्या रेखा कामडे, लता धकाते, तारा बावणे, पाककला विशारद अपर्णा कोलारकर, वैद्यकीय साहित्य तयार करणाऱ्या शिल्पा गणवीर, मुलांना घडवणारी आई चंद्रकला चिकाणे, मूकबधिर शाळेच्या आदर्श शिक्षिका मीनल सांगोळे यांचा समावेश होता. सत्कारमूर्ती खेळाडूंमध्ये बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, रौनक साधवानी, मृदुल डेहनकर, बॅडमिंटनपटू ऋतिका ठक्कर, खो-खो पटू राहुल सहारे, कराटेपटू साक्षी साहू, रेजू कुशवाह, देशज वैष्णव, दिलीप कावरे, सायकलपटू रजनी राऊत, रामायण स्पर्धेत अव्वल येणार अरबाज पप्पू कुरेशी, हॉकीपटू तौफिक अहमद, शहनाज खान, अॅथ्लिट अहफाज खान, बॅडमिंटनपटू सौरभ ईन्हानकर आणि आगीतून एकाचे प्राण वाचविणारा अविनाश शेंडे यांचा समावेश होता.