नागपूर : महिला उद्योजिकांना निष्पक्ष, सुरक्षित, परिस्थितीजन्य तंत्र आणि कायद्यासोबतच सुरक्षित समाज देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भारतात उद्योगात महिलांसाठी अनेक संधी आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन, समर्थन प्रदान करून अधिक यशस्वी व नवोदित महिला उद्योजिका तयार करण्याचा सरकारचा उद्देश आहे. स्पर्धेच्या युगात यशस्वी उद्योग स्थापन करून महिला सक्षम उद्योजिका व्हाव्यात, असे मत विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी येथे व्यक्त केले.
विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) महिला विंगतर्फे महिला उद्योजिकांच्या सशक्तीकरणावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हाधिकारी विमला आर., व्हीआयएचे अध्यक्ष सुरेश राठी, व्हीआयए महिला विंगच्या अध्यक्ष पूनम लाला, माजी अध्यक्षा अनिता राव, रश्मी कुळकर्णी उपस्थित होते.
विमला आर. म्हणाल्या, चार वर्षे ग्रामीण महिलांसोबत काम केले आहे. त्यांना महिला औद्योगिक क्षेत्रात काम करीत पाहण्याचे स्वप्न आहे. त्यांनी ग्रामीण क्षेत्रातील महिलांच्या सशक्तीकरणाचे उदाहरण देताना त्यांना शेतीत शिक्षित केल्याचे सांगितले. विशेष परिश्रमाने १८ लाख महिला यशस्वी शेतकरी बनल्या आहेत. कोणत्याही व्यवसायाला महिलांना कधीही कमी लेखू नये. आम्हाला त्यांना चांगली बाजारपेठ, प्रतिष्ठा आणि मानकीकरणासह कसे वाढवू शकतो, याचा विचार करण्याची गरज आहे.
पूनम लाला म्हणाल्या, व्हीआयए महिला विंग साहस, आत्मविश्वास व प्रतिबद्धतेची भावना विकसित करून महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देत आहे. उद्योजिकांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाची आमची मोहीम पूर्ण होणार आहे. सुरेश राठी म्हणाले, महिला उद्योजिकांमुळेच देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांसह त्यांना विशेष प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
संचालन अनिता राव यांनी केले. चर्चासत्रात व्हीआयएचे उपाध्यक्ष डॉ. सुहास बुद्धे, महिला विंगच्या सरला कामदार, प्रफुल्लता रोडे, मधुबाला सिंग, सरिता पवार, सईदा हक, चित्रा पराते, वाय. रमणी, नीलम बोवाडे, महिला टीम आणि अनेक महिला उद्योजिका उपस्थित होत्या.