लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारी सकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर एक महिला धावत्या रेल्वेगाडीतून प्लॅटफार्मवर पडल्यामुळे गंभीर जखमी झाली. आरपीएफचे जवान, कुलींनी त्वरित रुग्णवाहिकेस माहिती देऊन महिलेला स्ट्रेचरवर बसवून उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले.संगितालाल मालविया (४५) असे जखमी महिला प्रवाशाचे नाव आहे. त्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आल्या. त्यांचे पती धंतोलीत काम करतात. प्लॅटफार्म क्रमांक १ वर उभ्या असलेल्या म्हैसूर-जयपूर एक्प्रेसच्या जनरल कोचमध्ये त्या चढल्या. गाडी सुरू होऊन गाडीने वेग पकडताच त्या खाली पडल्या. यात त्या गंभीर जखमी झाल्या. रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक बी. के. पटेल, प्रवासी सुविधा पर्यवेक्षक प्रवीण रोकडे, कुली विशाखा डबले, सोनू गायकवाड आणि अब्दुल माजिद शेख यांनी या महिलेची मदत केली. तिला स्ट्रेचरवर बसवून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविले. रुग्णवाहिकेत बसवून या महिलेस उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेस जनरल कोचमधून धक्का लागल्याचे सांगितले. तर काहींनी पाय घसरून महिला पडल्याची माहिती दिली. जनरल कोचमध्ये खूप गर्दी होती. उन्हाळ्यामुळे रेल्वेगाड्यात गर्दी वाढते. त्यामुळे कोचच्या दरवाजावर उभे राहिल्यानंतर या महिलेस धक्का लागून ती खाली पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.रुग्णवाहिका पोहोचली उशिराघटनेची माहिती तातडीने रेल्वे रुग्णालयाला देण्यात आली. तरीसुद्धा अर्ध्या तासाने रेल्वे रुग्णालयाची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. हाकेच्या अंतरावर असलेल्या लोहमार्ग पोलिसांना सूचना देऊनही ते नेहमीप्रमाणे उशिरा पोहोचले. अशा अपघाताच्या प्रसंगी रुग्णवाहिका, पोलिसांनी तातडीने पोहोचवण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.