लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संघटित आणि असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांपुढे अनेक समस्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात पुरुषप्रधान संस्कृती आहे. त्यामुळे महिलांनी आपले अधिकार जाणून घेऊन आपल्या अधिकारासाठी लढा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग संचालनालयाच्या आयुक्त माधवी खोडे-चवरे यांनी केले.स्वतंत्र मजदूर युनियनच्या वतीने वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार, कर्मचारी अधिकाऱ्यांच्या महिला परिषदेत त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लिव्हर ट्रान्सप्लान्ट स्पेशालिस्ट डॉ. मनिषा बांगर, विचारवंत अॅड. वैशाली डोळस, मुंबईच्या कामगार आयुक्त शिरीन लोखंडे, एम. मनिकल, महापारेषणच्या मुख्य अभियंता जुईली वाघ, संघमित्रा ढोके उपस्थित होत्या. माधवी खोडे-चवरे म्हणाल्या, फुले, आंबेडकरी विचारात माणुसकीची एकता आहे. ही एकता टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र राहण्याची गरज आहे. महिलांसाठी प्रत्येक कार्यालयात विशाखा कमिटी आहे. महिलांनी कुठलाही त्रास सहन न करता आपल्या अधिकारासाठी जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी केले. शिरीन लोखंडे म्हणाल्या, कामगार चळवळीत बहुजन समाजाचे खूप कमी नेते आहेत. त्यामुळे स्वतंत्र मजदूर युनियनचे महत्त्व असून, कामगारांनी अशा संघटनेच्या पाठीशी राहण्याची गरज आहे. डॉ. मनिषा बांगर म्हणाल्या, असंघटित असल्यामुळे महिला कामगारांपुढे अनेक समस्या असतात. विदेशात किमान वेतन न मिळाल्यास सर्वजण लढा देतात. भारतात अशी स्थिती नाही. भारतातील कामगार जातीपातीत वाटल्या गेले आहेत. त्यामुळे सर्वांनी आंबेडकर, फुले, अण्णाभाऊ साठे यांचे कामगारांबाबतचे विचार जाणून घेण्याची गरज आहे. संघटित झाल्यासच कामगारांचे प्रश्न सुटतील, असे आंबेडकरांनी म्हटले होते. त्यामुळे कामगारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांची पुस्तके वाचण्याची गरज आहे. याशिवाय संघटित क्षेत्रातील महिलांनी असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविकातून एन. बी. जारोंडे यांनी संघटना २२ राज्यात कार्यरत असल्याचे सांगून, विषम व्यवस्थेचे बळी ठरलेल्या कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संघटना देशात कार्यरत असल्याचे सांगितले. अॅड. वैशाली डोळस यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे महिलांकरिता कार्य या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. संचालन निशा चौधरी, मीनाक्षी भिवगडे यांनी केले. आभार संस्कृती रहाटे यांनी मानले. कार्यक्रमाला महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिलांनी आपले अधिकार जाणून घेण्याची गरज : माधवी खोडे-चवरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 10:17 PM
प्रत्येक क्षेत्रात पुरुषप्रधान संस्कृती आहे. त्यामुळे महिलांनी आपले अधिकार जाणून घेऊन आपल्या अधिकारासाठी लढा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग संचालनालयाच्या आयुक्त माधवी खोडे-चवरे यांनी केले.
ठळक मुद्देस्वतंत्र मजदूर युनियनतर्फे महिला परिषद