लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय चातुर्वर्ण्य समाजव्यवस्थेत एकूणच महिलांना त्यांच्या अधिकारांपासून नेहमीच वंचित ठेवण्यात आले आहे. संविधानामुळे त्यांना त्यांचे अधिकार मिळवून दिले आहे. परंतु समाजातील चातुर्वर्ण्य मानसिकता अजूनही गेलेली नाही. त्यामुळे आजच्या काळातही महिलांना त्यांच्या हक्कापासून डावलले जाते. त्याचे प्रकार वेगवेगळे असतील परंतु महिलांना बरोबरीचा दर्जा देण्याच्या संकुचित मानसिकतेतून अजूनही महिलांवर अन्याय होत आहे. या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी समस्त महिलांनी एकजूट होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक भय्याजी खैरकर यांनी येथे केले.लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल, मैत्री संघ, संथागार फाऊंडेशन यांच्यातर्फे रविवारी विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात बौद्ध विहार प्रतिनिधींची सभा आयोजित करण्यात आली होती. त्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी डॉ. सरोज आगलावे, डॉ. वीणा राऊत, वामन सोमकुंवर, ममता बोदेले, सचिन मून, पुष्पाताई बौद्ध, प्रा. माधुरी गायधनी, एम.एस. जांभुळे, प्रा. विशाखा कासारे प्रामुख्याने उपस्थित होते.भय्याजी खैरकर म्हणाले, आज २१ व्या शतकात महिलांवरील अत्याचारासाठी एकजुटीची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. परंतु आंबेडकरी चळवळीतील महिलांनी ७५ वर्षांपूर्वीच महिलांच्या प्रश्नांवर ऐतिहासिक महिला परिषद भरविली होती. त्या परिषदेला तब्बल २५ हजार महिला सहभागी झाल्या होत्या. त्या ऐतिहासिक महिला परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शन केले होते. त्या काळात २५ हजार महिला एकजूट होऊ शकतात तर आज का नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.सरोज आगलावे, एम.एस. जांभुळे, ममता बोदेले, प्रा. विशाखा कासारे, डॉ. वीणा राऊत यांनीही मार्गदर्शन केले. संचालन नीना राऊत यांनी केले. वामन सोमकुंवर यांनी आभार मानले.दीक्षाभूमीवर होणार राष्ट्रीय महिला परिषद१९४२ ला ऐतिहासिक महिला परिषद पार पडली. त्या परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शन केले होते. त्या परिषदेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येत्या २२ ते २४ आॅक्टोबरदरम्यान दीक्षाभूमीवर राष्ट्रीय महिला परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला देशभरातील एक लाख महिला सहभागी होणार आहेत. त्याची पूर्वतयारी म्हणून बैठक-सभा घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही बैठक बोलावण्यात आली होती.
महिलांची एकजूट आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 1:20 AM
भारतीय चातुर्वर्ण्य समाजव्यवस्थेत एकूणच महिलांना त्यांच्या अधिकारांपासून नेहमीच वंचित ठेवण्यात आले आहे. संविधानामुळे त्यांना त्यांचे अधिकार मिळवून दिले आहे.
ठळक मुद्देभय्याजी खैरकर : बौद्ध विहार प्रतिनिधींची सभा