लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : थकीत वीज बिलाच्या रकमेचे हप्ते पाडून खंडित वीजपुरवठा सुरळीत करून देण्याच्या बदल्यात पाच हजाराची लाच मागणाऱ्या एसएनडीएलच्या महिला रिकव्हरी एजंटला एसीबीच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी जेरबंद केले. सुरैया खान शकील खान (वय ३०) असे तिचे नाव आहे.तक्रारदार भानखेड्यात राहतात. त्यांच्याकडे दोन मीटर असून, एक वडिलांच्या तर दुसरे त्यांच्या स्वत:च्या नावाने आहे. वर्षभरापासून या दोन्ही मीटरचे एकूण १ लाख २० हजारांचे बिल थकीत असल्याने एसएनडीएलने तक्रारदारांकडचा वीजपुरवठा खंडित केला होता.गेल्या आठवड्यात तक्रारदारांकडे एक महिला आली. आपण एसएनडीएलच्या छापरूनगर झोनमध्ये वसुली अधिकारी असून, आपले नाव सुरैया खान असल्याचे सांगितले. तिने आपले ओळखपत्रही दाखविले. त्यानंतर तुमच्याकडे थकीत बिलाची रक्कम मोठी असून त्यात व्याजाची रक्कमही जास्त आहे. एवढी रक्कम तुम्हाला एकसाथ भरता येणार नसल्याने, मी तुम्हाला हप्ते (किस्त) पाडून देते, असे म्हणत खंडित वीजपुरवठा सुरू करून देण्याचीही हमी दिली. त्यासाठी पाच हजार रुपये लाच द्यावी लागेल नाही तर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा दम दिला. तिने तगादा लावल्याचे पाहून तक्रारकर्त्याने एसीबीच्या अधिकाºयांकडे धाव घेतली. एसीबीने तक्रारीची शहानिशा केली. त्यानंतर सुरैयाला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे मंगळवारी दुपारी लाचेची रक्कम घेऊन तक्रारकर्ते सुरैयाकडे गेले. त्यांनी तिला लाचेची रक्कम दिली. तिच्याविरुद्ध तहसील ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीचे प्रभारी अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार, निरीक्षक राजेश पुरी, हवालदार अशोक बैस, नायक प्रभाकर बेले, शिशुपाल वानखेडे, शालिनी जांभूळकर, जया लोखंडे, गीता चौधरी आदींनी ही कामगिरी बजावली.सुरैयाने फोडला एसीबीला घामलाचेची रक्कम स्वीकारून सुरैया कार्यालयातून निघून गेली. इकडे बाहेर आलेल्या तक्रारदाराने इशारा करताच एसीबीचे पथक तिला जेरबंद करण्यासाठी कार्यालयात गेले. तेथे सुरैया नव्हतीच. शोधाशोध करूनही ती मिळेना. त्यामुळे एसीबीच्या अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला. तिच्या घराकडच्या मार्गावर शोधाशोध सुरू झाली. शेवटी कार्यालयापासून दोन किलोमीटर अंतरावर सुरैया मिळाली. तिला ताब्यात घेतल्याचे आणि तिच्याकडून लाचेची पावडर लावलेली रक्कम जप्त केल्याचे कळाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
नागपुरात एसीबीच्या जाळ्यात महिला अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:02 AM
थकीत वीज बिलाच्या रकमेचे हप्ते पाडून खंडित वीजपुरवठा सुरळीत करून देण्याच्या बदल्यात पाच हजाराची लाच मागणाऱ्या एसएनडीएलच्या महिला रिकव्हरी एजंटला एसीबीच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी जेरबंद केले. सुरैया खान शकील खान (वय ३०) असे तिचे नाव आहे.
ठळक मुद्देएसएनडीएलची वसुली एजंट : पाच हजारांची लाच