नागपूर : राज्य सरकारने किराणा दुकान आणि मॉलमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला महिला नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. एकीकडे वस्ती, मोहल्ल्यातील दारूचे दुकान बंद करण्यासाठी सामाजिक संघटना, महिला संघटना आंदोलने करतात. त्यासाठी टोकाचा संघर्ष करतात. पण आता तर किराणा दुकानांमध्ये वाईन ठेवून सरकार या संघर्षावरच पाणी फेरणार आहे.
दारुच्या नशेतून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची आकडेवारी मोठी आहे. त्या महिलांनाच आपण सामाजिक सुरक्षा देण्यात कमी पडत आहोत. अशात आता किराणा दुकानात वाईन विकून सरकार अनेक महिलांचे संसार उघड्यावर आणू पाहत आहे. याच्या दुष्परिणामांचा विचार करण्याएवढीही शुद्ध सरकारला राहिलेली नाही. हे सरकार सत्तेच्या नशेत गुंग झाले आहे. त्यामुळे ‘तुरुंगात जाईल, पण विकू देणार नाही वाईन’, असा निर्धारच महिला नेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
‘मस्त पिओ खूप पिओ` हा सरकारचा मंत्र आहे काय ?
कोरोना काळात औषधे आवश्यकता असताना दवा नही दारू देंगे, असे धोरण महाविकास आघाडीचे आहे. किराणा दुकान मॉलमध्ये वाईन विकल्याने म्हणे शेतकऱ्यांना नव्हे तर फक्त वाईन उद्योजकांना फायदा मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
किराणा दुकान सुपर मार्केट मध्ये आम्ही आपल्या मुलांना पाठवतो. दारू पिणारा नवरा असेल तर किराणा सामान घेऊन येईल की दुकानातून पिशवीत दारूच्या बाटल्या भरून आणेल, अशी भीती वाटत आहे दारू किराणा दुकानात विकण्याचा निर्णय ताबडतोब सरकारने मागे घ्यावा. नाहीतर सर्वसामान्य भगिनी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही.
- अर्चना डेहनकर, प्रदेश सचिव, भाजप
स्वार्थासाठी महिलांचा गळा का दाबता ?
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय नैतिकता, नीतीमत्तेला धरून नाही. हा निर्णय केवळ आणि केवळ स्वार्थापोटी घेतलेला असून हे केवळ आणि केवळ वसुली सरकार आहे. या वसुली सरकारची बेधुंद वसुली सुरू आहे. राज्यातील अनेक महिला महिलांच्या सक्षमीकरणासाठी, उत्थानासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी कार्य करीत आहेत. जेथे महिलांवर अन्याय होतो, तेथे या संघटना धावून जात आहेत. असे जीवतोडपणे कार्य करीत असताना राज्य सरकारद्वारे सुपर मार्केटमधून वाईन विक्रीचा निर्णय घेतला जातो, तेव्हा आमच्या कार्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहते. दारूने अनेक संसार उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे समोर असताना सरकारने असा निर्णय घ्यावा, याची लाज वाटते.
- प्रगती पाटील, नगरसेविका, भाजप
महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकार घेणार का ?
किराणा दुकान व सुपर शॉपमध्ये विकणे बरोबर नाही. महिला, मुले, मुली, लहान मुले खरेदीसाठी जातात. मद्यधुंद लोक तेथे वाईन खरेदीसाठी येतील. बहुतांश घरात महिलाच किराणा खरेदी करून आणतात. तिथे एखाद्या महिलेची छेडखानी झाली तर त्याची जबाबदारी सरकार घेणार का? यातून महिला सुरक्षा व कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आधीच युवा पिढी नशेच्या आहारी गेली आहे. असे सर्व खुले करून दिले तर कुणावरच नियंत्रण राहणार नाही. युवा पिढी बरबाद करण्याची ही योजना आहे.
- संगीता सोनटक्के, शहर अध्यक्ष, मनसे महिला सेना
मंत्र्यांनो आधी पत्नींचे तरी मत घ्या
- वाईन विक्रीचा निर्णय घेणऱ्या सरकारच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या पत्नी या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्याने लढा देताना दिसून येतात. हा निर्णय लागू करण्यापूर्वी एकदा सर्व मंत्र्यांनी किमान आपल्या सौभाग्यवतींचे मत तरी जाणून घ्यायला हवे. आधीच गल्लोगल्ली दारूची दुकाने, बार आहेत. आता किराणा दुकानात ठेवून लहान मुलांना आहारी न्यायचे आहे का ? त्यांचे भविष्य खराब करायचे आहे का ? अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा.
- अमृता अदावडे, समन्वयक, आपण फाऊंडेशन