नागपूर : बल्लारशा येथून दररोज सायंकाळी ५ वाजता सुटणारी बल्लारशा-वर्धा मेमो ट्रेन १७ ऑक्टोबरपासून दररोज दोन ते चार तास उशिराने धावत आहे. यामुळे मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनी व महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून ही मेमो ट्रेन वेळेत सोडावी अशी मागणी वुई फॉर चेंज या संघटनेने केली आहे.
संघटनेच्या संस्थापक प्रा. डॉ. रश्मी पारसकर-सोवनी यांच्या नेतृत्वात नुकतेच रेल्वे डिव्हिजनल मॅनेजर तुषारकांत पांडे यांना निवेदन देण्यात आले. डॉ. पारसकर यांनी सांगितले, वर्धा, सोनेगाव, हिंगणघाट, नागर, वरोरा येथील नागरीक मोठ्या संख्येने चंद्रपूर-बल्लारशा येथून निघणाऱ्या मेमो ट्रेनने प्रवास करतात. यामध्ये महिला व विद्यार्थिनींचाही समावेश आहे.
दररोज सायंकाळी ५ वाजता सुटणारी ही गाडी बल्लारशाहून रात्री ७ किंवा ८ सुटत असल्याने महिला व विद्यार्थिनींना आपल्या गावी पोहोचायला रात्रीचे दहा वाजतात. त्यामुळे प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनी आणि महिलांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक विद्यार्थिनी आणि महिला मेमो ट्रेनने जाणे टाळत आहेत. बहुतांश महिला एसटी आणि खासगी ट्रॅव्हल्सला पसंती देत आहेत. बसचे तिकीट परवडत नसल्यामुळे गरीब विद्यार्थिनींनी महाविद्यालयात जाणे बंद केले आहे.
विद्यार्थिनी आणि महिला रेल्वे स्थानकावर प्रत्येकी तीन तास थांबत असल्याने काही गुंड त्यांची छेडखानी काढतांना दिसतात. प्रवासी मुली तक्रार करायला घाबरतात. हे चित्र चंद्रपूर रेल्वेस्थानकावर नेहमीच पाहायला मिळते. बल्लारशा-वर्धा मेमो ट्रेन दररोज उशिरा धावत आहे. तिच्या वेळापत्रकाबद्दल किंवा उशिरा येण्याविषयी स्टेशनवर कोणतीही घोषणा आणि सूचना दिली जात नाही. त्यामुळे महिला प्रवासी ट्रेनची वाट पाहत बराच वेळ ताटकळत बसतात.
महिला प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, यामुळे अनेक प्रवाशांनी वैयक्तिकरित्या आणि प्रवासी संघटनेसारख्या संघटनांनी वर्धा, हिंगणघाट, वरोरा, बल्लारशा, चंद्रपूर येथील स्टेशन मास्तरांना निवेदने दिली, परंतु यातून काहीही साध्य झाले नसल्याचे डॉ. पारसकर यांनी सांगितले. शिष्ठमंडळात सुजाता लोखंडे, रश्मी पदवाड मदनकर, डॉ. चित्रा गुप्ता तूर, डॉ. नंदाश्री भुरे, अनघा वेखंडे, भवरी गायकवाड, कृतिका सोनटक्के, प्राची गायकवाड आदींचा समावेश होता.