मुस्लिम राष्ट्रीय मंचची भूमिका : ‘बीफ पार्टी’च्या विरोधात ‘मिल्क पार्टी’ उपक्रम राबविणारनागपूर : शनी शिंगणापूर येथील मूर्तीच्या चौथऱ्यावरील महिलांच्या प्रवेशाचा वाद ताजा असतानाच हाजी अली दर्ग्याच्या ‘मजार’मध्ये महिलांना प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी समोर येत आहे. या मुद्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत मुस्लिम राष्ट्रीय मंचाने महिलांच्या बाजूने भूमिका घेतली आहे. हाजी अलीच नव्हे तर कुठलाही दर्गा आणि मशिदीमध्ये महिलांना प्रवेश नाकारणे अयोग्यच असल्याचे मत मंचाचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद अफझल यांनी व्यक्त केले. नागपूर येथे आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.इस्लाम धर्मानुसार मक्का व मदिना येथील मशिदी सर्वात जुन्या मानल्या जातात. परंतु येथे महिलांना प्रवेशबंदी नाही. देशातीलदेखील अनेक मशिदी तसेच दर्ग्यांमध्ये महिलांना प्रवेश आहे. परंतु काही ठिकाणी प्रवेश नाकारण्यात येतो, हे अयोग्य आहे. हे समानतेचे युग आहे. महिलांना त्यांचा हक्क दिलाच पाहिजे. मशीदीमधील पावित्र्य राखण्यासाठी महिलांना मशिदीमध्ये ‘हिजाब’ (बुरखा घालून) ठेवून जाणे अपेक्षित आहे असे अफझल म्हणाले. यावेळी सहसंयोजक विराग पाचपोर, लतिफ मगदूम हे उपस्थित होते.‘बीफ’बाबत पसरवला जात आहे गैरसमज‘बीफ’ खाल्ल्यानंतर ‘जन्नत’ मिळेल असे इस्लाम धर्मात कुठेही नमूद नाही. परंतु तरीदेखील अशा आशयाच्या गोष्टी पसरवून औवेसी बंधूंसारखे लोक समाजात गैरसमज पसरवत आहेत. ‘बीफ पार्टी’च्या नावाखाली सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मुस्लिम राष्ट्रीय मंचतर्फे ‘मिल्क पार्टी’ करण्यात येणार आहे. मार्च महिन्यापासून याची सुरुवात होईल. या उपक्रमाअंतर्गत गायीचे दूध जमा करून ते घराघरांमध्ये वाटण्यात येईल व गाईचे महत्त्व सांगण्यात येईल, अशी माहिती मोहम्मद अफझल यांनी दिली. असहिष्णुता असती, तर राम मंदिर झाले असतेदेशात असहिष्णुता पसरल्याची ओरड करण्यात येते. परंतु मुळात अशी अजिबात स्थिती नाही. जर देशातील ८० कोटी हिंदूंनी ठरविले तर अयोध्येत राम मंदिर कधी पण उभे राहू शकते. परंतु सहिष्णुतेमुळेच मुस्लिमांची बाजूदेखील ऐकून घेतली जात आहे, असे अफझल म्हणाले. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अनेक पक्षांनी मुस्लिम समाजाला धोका दिला आहे. त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. देशातील मुस्लिमांचा ‘डीएनए’ हा बाबर किंवा गझनी यांच्याशी नाही तर राम आणि देशातील लोकांशी जुळतो, असे धाडसी विधानदेखील त्यांनी केले.
हाजी अलीमध्ये महिलांना प्रवेश द्यावा
By admin | Published: January 31, 2016 3:10 AM