सर्व भाषीय कलार समाजाचा मेळावा: सुदीप जायसवाल यांचे प्रतिपादन नागपूर : महिलांचा मान-सन्मान झाला, तर समाजाचा सन्मान होईल. त्यामुळे प्रत्येक समाजात महिलांचा सन्मान झाला पाहिजे, असे प्रतिपादन शहरातील प्रसिद्ध विधीतज्ज्ञ अॅड़ सुदीप जायसवाल यांनी केले. सर्व भाषीय कलार समाज ट्रस्टच्यावतीने रविवारी आयोजित युवक-युवती परिचय मेळावा आणि समाज महासंमेलनात ते बोलत होते. रेशीमबाग येथील जैन कलार समाज भवनात हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी केंद्र सरकारच्या केंद्रीय पर्यटन सल्लागार परिषदेचे सदस्य चंद्रपाल चौकसे होते. अतिथी म्हणून रवींद्र दुरुगकर, मोहनसिंह अहलुवालिया, जयनारायण चौकसे, त्रिलोकीनाथ शिवहरे, ओ. पी. जायसवाल, नारायणराव टाले, नरेंद्र वासेकर व सर्व भाषीय कलार समाज ट्रस्टचे अध्यक्ष फाल्गुन उके उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अॅड़ जायसवाल पुढे म्हणाले, समाजात एकता निर्माण करण्यासाठी प्रथम स्वत:च्या घरात एकता आणली पाहिजे. तसेच युवक -युवतींच्या परिचय मेळाव्यासह ज्यांचे जीवनसाथी वेगवेगळ््या कारणांमुळे दुरावले आहेत, अशा महिला व पुरुषांसाठीही परिचय मेळाव्यांचे आयोजन व्हावे, अशी त्यांनी यावेळी भावना व्यक्त केली. रवींद्र दुरुगकर यांनी युवक-युवती परिचय मेळाव्यांसह सामुहिक विविध सोहळ््यांचे सुद्धा आयोजन व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. सोबतच जेव्हापर्यंत कलार समाज हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही, तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही. त्यामुळे समाजाने आपल्या आर्थिक विकासाकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी आवाहन केले. तसेच कलार समाज हा संपूर्ण देशभरात विखुरला असल्याचे त्यांनी स्पष्ट करू न त्या सर्व समाजाला एकजूट करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. या मेळाव्यात संपूर्ण राज्यातील शेकडो तरुण-तरुणी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. संचालन अॅड. सुर्यकांत जायसवाल व ओमकार सुर्यवंशी यांनी केले. (प्रतिनिधी)
महिलांचा सन्मान व्हावा
By admin | Published: January 11, 2016 2:56 AM