लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजच्या धावपळीच्या युगात कुटुंबाचा गाडा हाकताना केवळ पुरुषांनीच नोकरी अथवा व्यवसाय करून भागत नाही. आज नोकरी मिळणे ही कठीण बाब झाली आहे. अशा परिस्थितीत महिलांनी आपल्यातील कौशल्य ओळखून केवळ नोकरी करून संसाराच्या चाकाला गती देण्याचा विचार बाजूला टाकावा, कौशल्याच्या बळावर उद्योगाची कास धरून इतरांनाही नोकरी देणाऱ्या बना, असा कानमंत्र संस्कारभारतीच्या अध्यक्ष कांचनताई गडकरी यांनी दिला.महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती व समाज कल्याण विभागाच्या वतीने शहर समृध्दी उत्सवांतर्गत आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचा शनिवारी समारोप झाला. यावेळी अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या. मंचावर वैशाली कोहळे, शोभा व्यास, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होत्या.कांचनताई म्हणाल्या, कुटुंबाची घडी व्यवस्थित ठेवण्यासाठी महिला सक्षम असणे आवश्यक आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत. उद्योग व्यवसायातही महिला पुढे येत आहेत. महापालिकेच्या वतीने आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या माध्यमातून अनेक महिलांना मागील दहा वर्षापासून स्वयंरोजगाराचा मार्ग सापडला, ही बाब अभिनंदनीय आहे. उद्योगासाठी गुणवत्ता, पॅकेजिंग आणि वेळेचे व्यवस्थापन या तीन सूत्रांचा योग्य समन्वय आवश्यक आहे. अगदी छोट्या गोष्टींपासून आपणाला उद्योग सुरू करता येऊ शकतो. यासाठी केवळ आपली कल्पकता आणि बाजारातील मागणी यांचा योग्य विचार, अभ्यास करणे गरजेचे आहे. आपल्यातील गुणांची योग्य पारख आणि जोपासणा करून उद्योगासाठी आवश्यक बाबींचा अभ्यास करून उद्योगाला सुरुवात करावी, असे आवाहन गडकरी यांनी केले.तत्पूर्वी महिला सशक्तीकरणाची मशाल पेटवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर जागर महिलांच्या जाणिवांचा, सावित्रीच्या लेकीचा असा संदेश असलेला बलून मान्यवरांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आला. प्रगती पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विशाखा मोहोड यांनी तर संचालन स्मिता खनगई यांनी केले. उपसभापती विशाखा मोहोड, समितीच्या सदस्या दिव्या धुरडे, सरिता कावरे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, झोन सभापती रूपाली ठाकूर, रिता मुळे, वंदना येंगटवार, संगीता गिऱ्हे, वंदना चांदेकर, सत्ता पक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेविका वैशाली नारनवरे, मनीषा अतकरे, स्वाती आखतकर, शीतल कांबळे, माजी नगरसेविका नीलिमा बावने उपस्थित होत्या.विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कारमहिला उद्योजिका मेळाव्यात फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे, उद्योजिका प्रतीक्षा पटवारी, गौरी रंगनाथ, सामाजिक समरसता मंचच्या माया गायकवाड, शारदा सुरेश, शिक्षण क्षेत्रातील महिलांसाठी कार्य करणाऱ्या सुचेता मेश्राम, शोबिज एंटरटेन्मेंटच्या रूही अफजल, सची मलिक, सामाजिक संदेशासह देशभरात पाच हजार किमीची सायकल रॅली करणारा रितेश भोयर, माजी महापौर बैरणबाई यांच्यासह परिसरात लावण्यात आलेल्या उत्कृष्ट स्टॉल धारकांमधून नीती फाऊंडेशन या दिव्यांगांच्या स्टॉलच्या निर्मल घोडेस्वार, नागपूर मध्यवर्ती कारागृहातील स्टॉलचे गजानन चोपडे, अथर्व महिला बचत गट स्टॉलच्या प्रतिभा कोल्हे, रिता भोंडे, कापडी पिशव्यांचे स्टॉल लावून प्लास्टिकसाठी उत्तम पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या सुजाता मोकलकर यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लावणीच्या कार्यक्रमाने समारोप करण्यात आला.