लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तिच्या गरोदरपणावर तिचाच अधिकार आहे. नवरा म्हणतो, घरचे लोक दबाब आणतात म्हणून सुशिक्षित स्त्रियाही लिंग निदान चाचणी करतात. पण, मुलगा आणि मुलगीत काहीच फरक नाही. गर्भलिंग निदान चाचणीला ठाम विरोध करा, असे आवाहन पद्मश्री डाॅ. राणी बंग यांनी केले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती युवा शाखेने युवा वक्ता संवर्धन प्रकल्प -२०२२ अंतर्गत ८ ते १४ मार्च दरम्यान आयोजित ‘महिला जागृती महोत्सव-२०२१’ चे आयोजन केले होते. त्याच्या समारोपीय सत्रामध्ये ‘स्त्रियांचे आरोग्यविषयक समस्या व उपाय' या विषयावर प्रश्नोत्तराच्या स्वरूपात त्या मार्गदर्शन करत होत्या.
अ.भा.अंनिस युवा शाखेने समाज माध्यमावरून स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या, प्रश्न पाठवण्याचे जाहीर आवाहन नागरिकांना केले होते. असंख्य प्रश्नाच्या स्वरूपात प्रतिसाद मिळाला. आलेल्यांपैकी अत्यंत महत्त्वाचे व संवेदनशील प्रश्न डाॅ. राणी बंग यांना विचारण्यात आले. युवा शाखेच्या महाराष्ट्र राज्य संपर्क व नियोजन प्रमुख हर्षाली लोहकरे व पुणे युवा शाखेचे जिल्हा संघटक प्रफुल्ल पवार यांनी प्रश्न विचारून मुलाखत घेतली.
या महोत्सवाचे उद्घाटन ८ मार्चला मगन संग्रहालय वर्धा येथील अध्यक्षा डॉ. विभा गुप्ता यांच्या हस्ते झाले. ‘चाहिए महिला विकास तो कौन करेगा प्रयास’ या विषयावर मार्गदर्शन केले. नंतरच्या दिवशी अनुक्रमे मंजूषा खुदरे, करिश्मा मोहरले, प्रियांका दिघोरे, तेजस्विनी क्षीरसागर, संपदा नाईक यांचे मार्गदर्शन झाले.
समारोपीय कायरक्रमाचे प्रास्ताविक वाशिम शाखेचे जिल्हा अध्यक्ष नीलेश मिसाळ यांनी केले. परिचय श्रावण खुदरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन युवराज राठोड तर आभार सेजल फेंडर यांनी मानले. यावेळी अ. भा. अंनिस राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे, महसचिव हरीश देशमुख, कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, उपाध्यक्ष रवींद्र खानविलकर, राज्य युवा शाखा संघटक पंकज वंजारे, महाराष्ट्र संघटक हरिभाऊ पाथोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.