लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : येरला (ता. नागपूर ग्रामीण) येथील अवैध दारूविक्रेत्यांनी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने स्थानिक तरुणांवर काठ्या व तलवारीने हल्ला चढवित त्यांना मारहाण केली. या घटनेचे पडसाद म्हणून स्थानिक महिलांनी अवैध दारूविक्रेत्यांच्या घराला घेराव केला. ही घटना रविववारी (दि. १७) रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली असून, पाेलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा नाेंदविला आहे.
अखिल रामभाऊ बदकी (२३, रा. फेटरी, ता. नागपूर ग्रामीण) व सचिन सूर्यभान वाढी, रा. येरला, ता. नागपूर ग्रामीण अशी जखमींची तर आनंद वर्मा, गोलू वर्मा, अमिनेश वर्मा, मनीष वर्मा, लाला यादव, साहिल ढोणे, हेमंत मोंढे, अमन शेवाळे, सर्व रा. येरला, ता. नागपूर ग्रामीण अशी आराेपींची नावे आहेत. अखिल वाहनचालक म्हणून काम करताे. ताे रविवारी रात्री येरला येथील संजू बोंडे याच्या पानटपरीवर चहा पिण्यासाठी थांबला हाेता. त्यातच राजेश तांगले यांनी त्याला त्याचा मित्र सचिनला बाेरगाव फाट्याजवळ गाेलू, आनंद, अमिनेश व त्यांच्या चार साथीदार मारहाण करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे अखिलने राजेशला साेबत घेऊन बाेरगाव फाटा परिसराची पाहणी केली. तिथे त्यांना सचिन आढळून न आल्याने ते येरल्याला परत आले.
दरम्यान, आनंद, गोलू, अमिनेश, मनीष, लाला, साहिल, हेमंत, अमन यांच्यासह त्यांच्या चार साथीदारांनी त्यांना येरला-खडगाव राेडवर अडविले. आनंद व गाेलूच्या हातात तलवार तर मनीषच्या हातात काठी हाेती. अखिलने त्यांना सचिनला मारहाण का केली, अशी विचारणा करताच त्यांनी शिवीगाळ करीत अखिललाही मारहाण केली. त्यामुळे दाेघांनीही पाेलीस ठाणे गाठून तक्रार नाेंदविली. पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपासाला सुरुवात केली. या घटनेचे पडसाद लगेच उमटले. आराेपींमध्ये काही अवैध दारूविक्रेते असल्याने स्थानिक महिलांनी दारूविक्रेत्यांच्या घराजवळ गाेळा हाेत घराला घेराव केला. एवढेच नव्हे तर त्यांनी गावात अवैध दारूविक्री करण्यास विराेध केला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. तत्पूर्वी आराेपींनी गावातून पळ काढला.
...
दारूविक्रेत्यांची वाहने जाळली
संतप्त महिला कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांनी अवैध दारूविक्रेत्यांच्या दुचाकी वाहनांची ताेडेफाेड करीत त्या जाळल्या. अवैध दारूविक्रेत्यांच्या घरी धाडी टाकून त्यांच्यावर कठाेर कारवाई करण्याची मागणीही महिलांनी रेटून धरली हाेती. याच महिलांनी साेमवारी (दि.१८) सकाळी कळमेश्वर-नागपूर मार्गावर काही काळा ‘रास्ता राेकाे’ आंदाेलन केले. आ. समीर मेघे यांनी येरला येथे येऊन महिलांशी चर्चा केली. त्यांनी लगेच महिलांची विशेष ग्रामसभाही घेतली. दारूविक्री व अवैध धंद्यांना पाेलिसांचा वरदहस्त असल्याचा आराेप महिलांनी केला. या सभेत गावात कुणीही अवैध दारूविक्री करणार नाही तसेच पाेलीस अवैध दारूविक्रेत्यांना व अवैध धंद्यांना पाठबळ देऊ नये, असा ठरावही पारित करण्यात आला.
....
येरल्यासाेबत कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूविक्री व अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही. काेणत्याही गावात अवैध धंदेवाले अरेरावी करीत असले तर नागरिकांनी तातडीने आपल्याशी संपर्क साधून माहिती द्यावी. येरला येथील अवैध दारूविक्री व अवैध धंद्यांना आळा घालून आराेपींवर कठाेर कारवाई केली जाईल.
- आसिफराजा शेख, ठाणेदार, कळमेश्वर.