अधिकाऱ्याविरुद्ध पीडित महिलांचा एल्गार : पोलीस महासंचालकांकडे तक्रार नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस महानिरीक्षकांच्या (स्पेशल आयजी) कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडून महिलांचा मानसिक छळ होत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. या प्रचंड संतापजनक प्रकरणात तोंड दाबून बुक्क्यांच्या मार सहन करणाऱ्या महिलांनी या छळाला कंटाळून एक निवेदनवजा तक्रारपत्र पोलीस महासंचालक, गृहविभागाचे अप्पर सचिव आणि अन्य वरिष्ठांकडे पाठविले आहे. त्यात त्यांनी कार्यालयीन अधीक्षक कसे नको त्या भाषेत बोलून अपमान करतात, अंगाला स्पर्श करतात त्यासंबंधाची छळकथा मांडली आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जाचातून आपली सुटका व्हावी, अशी विनंतीही या तक्रारपत्रातून त्यांनी वरिष्ठांना केली आहे. राज्याच्या पोलीस दलात खळबळ उडवू पाहणाऱ्या या प्रकरणाची माहिती अशी, नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांचे कार्यालय सदर पोलीस ठाण्याच्या बाजूला आहे. या कार्यालयातून नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा अशा चार जिल्ह्यातील पोलीस विभागाच्या कामकाजाची, कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी, कारवाया तसेच प्रशासकीय कामकाजाची देखरेख अन् अहवाल नोंदणी चालते. कार्यालयात पुरुषांप्रमाणेच महिला कर्मचाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. या कार्यालयातील महिलांनी केलेल्या तक्रारीनुसार, कार्यालयीन अधीक्षक त्यांचा प्रचंड छळ करतो आहे.महिलांच्या बाबतीत एकेरी उल्लेख करतो. कामाच्या बहाण्याने त्यांना समोर बोलवून विनाकारण उभे ठेवतो. बसायला लावतो. नको त्या गोष्टी बोलतो. खांद्यावर हात ठेवणे, हाताला स्पर्श करणे, नको तशा भाषेत त्यांच्याशी बोलणे, त्यांनी विरोध केल्यास त्यांना विनाकारण त्रास देणे असे प्रकार करतो. पोलीस महासंचालकांकडे पाठविलेल्या तीन पानांच्या तक्रारपत्रात महिलांनी लिहिल्याप्रमाणे अधीक्षकांवर त्यांनी अतिशय गंभीर आरोप लावले आहे. त्यांच्या कथनानुसार, ही नवऱ्यावर दादागिरी करते, ही कार्यालयात दादागिरी करते. असभ्यतेचा कळस ! अधीक्षक केवळ सहकारी कर्मचारीच नव्हे तर अनेकदा विविध कारणांमुळे कार्यालयात आलेल्या महिलेच्या पतीसमोर तिच्यासोबत असभ्य वर्तन करतात. याउलट अनेकदा ते महिलांसमोर दुसऱ्यांशी बोलताना वाईट पद्धतीने संभाषण करतात. त्यांचा एसीआर खराब करण्याच्या धमकी देतात. हे अधीक्षक अनेकदा महिलांसमोर कार्यालयात शिट्या वाजवतात अन् गाणीही म्हणतात. संबंध नसताना महिलेला समोर बसवून आपल्या बढाया मारतात, असेही या तक्रारीत नमूद आहे. याशिवायही अनेक गंभीर आरोप या तक्रारपत्रातून महिलांनी केले आहेत. महिला आयोगाकडेही तक्रार अधीक्षकांच्या या वर्तणुकीमुळे कार्यालयात काम करणाऱ्या संबंधित महिलांमध्ये तीव्र रोष आहे. अधिकारी असल्यामुळे त्याच्याविरुद्ध बोलण्याची महिला हिंमत करीत नाही. मात्र, या अधिकाऱ्याचा निर्ढावलेपणा वाढतच चालल्यामुळे कोंडी झालेल्या महिलांनी एकत्रित होऊन पोलीस महासंचालक सतीश माथुर, गृहविभागाचे अप्पर सचिव तसेच अन्य वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांनाही या तक्रारीची प्रत त्यांनी पाठविली आहे. त्यात एकूण सात महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या गंभीर प्रकरणाची कसून चौकशी करून आमची या त्रासातून सुटका करा, अशी विनंतीही या महिलांनी केली आहे. चौकशी सुरू आहे : पोलीस महानिरीक्षक लोकमतला या गैरप्रकाराची कल्पना आल्यानंतर प्रस्तुत प्रतिनिधींनी शहानिशा केली. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विक्रमसिंह पाटणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारची तक्रार वरिष्ठांकडे झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. या प्रकरणात काय वस्तुस्थिती आहे, त्याची आम्ही गांभिर्याने चौकशी करीत आहोत, असेही पाटणकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
आयजी कार्यालयात महिलांचा छळ
By admin | Published: June 20, 2017 1:41 AM