नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कंधो से मिलते है कंधे, कदमो से कदम मिलते है!
हम चलते है, जब ऐसें तो, दुष्मन के दिल हिलते है !!’
होय, पोलीस दलातील रणरागिनी जेव्हा रस्त्यावर चालते, तेव्हा समाजकंटक, गुन्हेगारांच्या काळजात धस्स होते. नागरिकांच्या संरक्षणासाठी तत्पर असलेल्या वूमेन वॉरियर्स कोरोनाच्या काळात आपल्या चिल्यापिल्यांना दूर ठेवून आपले कर्तव्य बजावताना दिसतात. कडक गणवेशात जेव्हा त्या रस्त्यावर येतात तेव्हा खाकी अधिकच खुलते. महिला, मुलींना एक वेगळा दिलासा मिळतो. शहर पोलीस दलात १६१२ महिला पोलीस आहेत. त्यातील १०४ अधिकारी आणि १५०८ कर्मचारी आहेत. मानकापूर आणि वाठोडा पोलीस ठाण्यात प्रमुख, अर्थात ठाणेदार म्हणून वैजयंती मांडवधरे, तसेच आशालता खापरे या दोन महिला अधिकारी सेवा बजावत असून, विविध पोलीस ठाण्यांत द्वितीय पोलीस निरीक्षक, निरीक्षक, तसेच गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा विभाग, भरोसा सेल, दामिनी पथक, अमली पदार्थविरोधी पथक आणि वाहतूक विभागातही महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पुरुष अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावीत आहेत.
अवैध धंदे आणि बोकाळलेल्या गुन्हेगारीमुळे अनेक ठिकाणी महिला, मुलींना असुरक्षित वाटते. मात्र, जेव्हा या रणरागिनी रस्त्यावर उतरतात तेव्हा महिला, मुलींच्या मनात त्या ‘हम है ना’ म्हणत नवा विश्वास निर्माण करतात.
नागरिकांच्या सुरक्षेचे व्रत घेऊन खाकी अंगावर चढविणाऱ्या महिला पोलिसांना दुहेरी भूमिका वठवावी लागते. त्यातील सर्वांत अवघड अशी भूमिका आईची असते. उशिरा रात्रीपर्यंत कर्तव्य बजावून घरी जाताना, आपल्या चिल्यापिल्यांना भेटताना त्यांच्या मनाचा हिय्या होतो. आपल्यामुळे आपल्या मुलांना धोका होऊ नये, अशी भावना त्यांना सारखी अस्वस्थ करते. या अस्वस्थतेतूनच अनेक महिला अधिकारी-कर्मचारी कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य बजावतात.
---
वैजयंती मांडवधरे
(ठाणेदार, मानकापूर)
वैजयंती मांडवधरे या मानकापूरच्या ठाणेदार म्हणून कार्यरत आहेत. ठाणेदार म्हणून त्यांना २४ तास अलर्ट असावे लागते. कोणती घटना कुठे घडेल आणि केव्हा कुठे जावे लागेल, याचा नेम नसतो. याशिवाय दैनंदिन गुन्ह्याचा तपास, आपल्या भागातील अवैध धंदे, गुन्हेगारांवर नियंत्रण, पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याची जबाबदारी, अशा अनेक पातळ्यांवर त्यांना काम करावे लागते. हे सर्व करतानाच आई म्हणून वेगळी जबाबदारी पार पाडावी लागते. त्या म्हणतात, मुलगा विधिक आता समजदार झाला आहे. त्याला कळते. म्हणून कर्तव्य पार पाडताना आता तेवढे टेन्शन येत नाही.
---
सपना क्षीरसागर
(पोलीस निरीक्षक, हिंगणा)
पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावताना सगळा विसर पडतो. समाजातील कु-प्रवृत्तीला वठणीवर आणण्यासाठी रात्रं-दिवस काम करावे लागते. कसलाही धोका पत्करताना काहीही वाटत नाही. वरिष्ठांचे सतत प्रोत्साहन मिळते. मात्र, आई म्हणून मनाची घालमेल होते. सपना क्षीरसागर यांचा मुलगा अंशुल ११ वर्षांचा आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता त्याला त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांसोबत मुंबईला ठेवले आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे त्याची भेट घेणे शक्य होत नाही. तो फोन करतो आणि वारंवार भेटायला का येत नाही, असा निरागस प्रश्न करतो. तेव्हा आई म्हणून मनाची खूप घालमेल होते.
---
मीना जगताप
(पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा)
मीना जगताप या आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. कर्तव्याला न्याय देताना कर्तव्यकठोर बनावे लागते. मात्र, आईच्या भूमिकेत परतल्यानंतर मन कासावीस होते. मुलगी समीक्षा अवघी १० वर्षांची आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन तिला वडिलांकडे पुण्यालाच ठेवले आहे. आई भेटत नाही, प्रत्यक्ष जवळ राहत नाही, म्हणून समीक्षा फोनवर सारखी भेटण्याचा बालहट्ट धरते. आई आताच ये, असे तिचे बोल ऐकून मनाची अवस्था शब्दातीत होते.
----