पाच जानेवारीला सुरेश भट सभागृहात महापौर पदाची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेत ५० टक्क्यांहून अधिक महिला नगरसेविका आहेत. महापौरपदासाठी दयाशंकर तिवारी यांचे नाव निश्चित झाले आहे. मनीषा कोठे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला असल्याने या पदावर महिला नगरसेविकेची निवड करण्याचा सत्तापक्षाचा विचार आहे. पुढील वर्षात मनपाची निवडणूक असल्याने जातीय समीकरणाचा विचार करता महापौरपद हिंदी भाषिक व्यक्तीला दिल्याने उपमहापौरपदी कुणबी वा तेली समाजातील नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. अद्याप नाव निश्चित झालेले नाही. मंगळवारी भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, उपमहापौरपदी पूर्व नागपूरची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. कारण मनीषा कोठे यांची या पदावर अडीच वर्षासाठी निवड करण्यात आली होती. परंतु संदीप जोशी यांच्या सोबतच कोठे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. भाजप कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करते याकडे लक्ष लागले आहे. कोठे यांना पुन्हा संधी दिली जाण्याचीही चर्चा आहे.
........
मावळत्या वर्षात उमेदवारी, नवीन वर्षात निवड
महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ३० डिसेंबरला सकाळी ११ ते ३ दरम्यान उमदेवारी अर्ज दाखल करावयाचा आहे. संख्याबळाचा विचार करता भाजपाचाच महापौर व उपमहापौर निवडून येईल. कारण १५१ नगरसेवकांपैकी १०८ भाजपचे नगरसेवक आहेत. निवडणुकीसाठी ५ जानेवारीला मनपाची विशेष सभा बोलावण्यात आली आहे. मावळत्या वर्षात अर्ज तर नवीन वर्षात निवड केली जाईल. सुरेश भट सभागृहात कोविड निर्देशाचे पालन करून ही सभा होणार आहे.