लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : राज्य शासनाच्या खादी ग्रामाेद्याेग विभागाच्यावतीने काेराडी नजीकच्या घाेगली शिवारात हस्तशिल्प रेडिमेड गारमेंट क्लस्टरची उभारणी करण्यात आली आहे. या क्लस्टरचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून, त्याला आता उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. या क्लस्टरच्या माध्यमातून शेकडाे महिलांना राेजगार मिळणार आहे.
घोगली, कोराडी, महादुला, लोणखैरी आदी गावातील गरजू, विधवा, बेरोजगार महिलांना उत्तम गृहउद्योग उपलब्ध होणार असून, या क्लस्टरच्या क्षमतेनुसार ५३० महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या क्लस्टरचे काम प्रज्ञाशील बहुउद्देशीय संस्था, नागपूरच्या वतीने करण्यात येत असून, त्याच्या पालकत्वाची जबाबदारीही संस्थेला दिली आहे. आजपर्यंत शासन व सदस्यांमार्फत ४० लाखाचा खर्च या क्लस्टरच्या उभारणीसाठी करण्यात आला. या ठिकाणी काच, बटन करणे, एम्ब्रॉयडरी करणे, शिलाईसाठी कपड्याचे कटिंग करणे, विविध आकर्षक व आधुनिक कपड्यांची निर्मिती करणे आदी बाबी उपलब्ध होणार असल्याचे संस्थेच्या सचिव हिरा गेडाम यांनी सांगितले.
क्लस्टर परिसरात पोषक नैसर्गिक वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत. संस्थेच्यावतीने घोगलीच्या सरपंच कल्पना वानखेडे, महादुलाचे नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्या हस्ते मंगळवारी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गारमेंट क्लस्टरमध्ये उपलब्ध साहित्य व शासन आणि सभासदाच्या निधीतून उपलब्ध केलेल्या यंत्राचा आढावा घेण्यात आला. यावेळी यशोधरा नागपूर फर्स्टचे तन्वीर मिर्झा, अनिल निंभोरकर, प्रज्ञा हिरेखण, हिरा गेडाम, स्वप्निल धुईजाेड, फॅशन डिझायनर सुनील मोटघरे, तृप्ती वानखेडे आदी उपस्थित होते. या ठिकाणी शासनामार्फत खादी ग्रामोद्योगाशी संबंधित विविध योजना आणल्या जातील, महिलांना या ठिकाणी येणे शक्य नसल्यास त्यांना गृहकार्य म्हणून घरी उद्योग दिला जाईल. तसेच ज्या महिला स्वतंत्रपणे हस्तशिल्प एम्ब्रॉयडरीचे कपडे तयार करू शकतात, त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. येथील यंत्राच्या मदतीने त्यांच्या कार्याला गती येण्यासाठी मदत केली जाईल, अशी माहिती देण्यात आली.