नांदच्या महिलांनी केली ‘दारू नको’ ची गर्जनानांद : ‘गावात एवढ्या साऱ्या आत्महत्या झाल्या. आमच्या आयाबहिणींचे कुंकू पुसल्या गेले. अनेकांचे संसार उघड्यावर आले. दारूमुळे हा सारा सत्यानाश झाला, असे असताना आणखी किती बळी घेणार’ असा सडेतोड सवाल करत ‘गावात पुन्हा देशी दारूची दुकाने नकोत’ अशी गर्जना नांद येथील महिलांनी करीत राजरोसपणे सुरू असलेले ‘अवैध धंदे हटाव’चा नारा दिला. नांदच्या सरपंच भारती भैसारे यांनी सोमवारी ‘विशेष महिला ग्रामसभा’ आयोजित केली होती. यामध्ये देशी दारूचे दुकान पूर्ववत सुरू करण्याबाबतचा विषय होता. याबाबतच्या विषयाची नोटीस निघताच गावात विविध चर्चेला ऊत आला. अशातच ‘लोकमत’मध्ये २ आॅगस्टच्या अंकात ‘देशी दारूची दुकाने पुन्हा सुरू करण्याचा घाट’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच घरोघरी याप्रकरणाची खमंग चर्चा रंगली. मागील पाच वर्षापासून बंद असलेली देशी दारूची दुकाने पुन्हा सुरू झाली तर आपले गाव व्यसनाच्या आहारी जाऊ शकते, या विचाराने साऱ्यांचीच झोप उडाली. या चर्चेतच आज, सोमवारी सकाळी ११ वाजता ग्रामसभेला सुरुवात झाली. परंतु सभेच्या अध्यक्षस्थानी कुणाचीही घोषणा करण्यात आली नाही. शिवाय सभेचा वृत्तांत नोंदविण्यासाठी कुणीही हजर नव्हते. त्यामुळे ही कसली ग्रामसभा असा सूर महिलांचा होता. अशातच सभा सुरू होताच उपस्थित महिलांनी देशी दारूचे दुकान सुरू करायचे नाही, असा सूर आळवला. सभेला उपस्थित सुमारे २०० महिलांनी एकजुटीने देशी दारूच्या दुकानाला विरोध दर्शवित, दारूबंदीच्या लढ्यात आता माघार घ्यायची नाही, या निर्धाराने आपला संताप व्यक्त केला. या सभेत महिलांनी सरपंच भारती भैसारे यांच्यावर जोरदार टीका करीत देशी दारू दुकाने सुरू करण्याबाबतचा डाव हाणून पाडला. सोबतच गावात राजरोजपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवरही लगाम लावण्याची जोरदार मागणी केली. पोलिसांच्याच आशीर्वादाने अवैध धंदे सुरू असल्याचाही घणाघात यावेळी महिलांनी केला. तीन तास चाललेल्या या घमासान चर्चेत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. अखेरीस महिलांनी ग्रामसभेवर बहिष्कार टाकत, सभात्याग केला. अशातच दारू दुकाने सुरू करण्याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाही, अशी घोषणा सरपंच भारती भैसारे यांनी करत सभा संपल्याचे जाहीर केले. यामुळे दोन देशी दारूंची दुकाने पूर्ववत सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी आयोजित विशेष महिला ग्रामसभा कोणताही निर्णय न होता बारगळली. सभेनंतर महिलांच्या एकजुटीमुळेच पुन्हा एकदा ‘महिला जिंकल्या अन् दारू हरली’ अशा प्रतिक्रिया नांदवासीयांमध्ये दिसून आल्या. ग्रामसभेला उमरेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकरसिंग राजपूत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. येत्या काही दिवसात अवैध धंदे पूर्णपणे बंद होतील, असे आश्वासन राजपूत यांनी यावेळी दिले. जिल्हा परिषद सदस्या नंदा नारनवरे यांनीही आपले विचार मांडत ही ग्रामसभा कायदेशीर नसल्याचा आरोप करीत महिलांच्या सोबतीला असल्याचा विश्वास व्यक्त केला. गावात काही काळ तणावाचे वातावरण होते. परंतु, चोख पोलीस बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (वार्ताहर)
महिला जिंकल्या; दारू हरली!
By admin | Published: August 05, 2014 1:02 AM