भिवापूर : ‘त्या’ प्रभागात प्रत्येक घरी नळ असला तरी, त्यातून पाण्याचा थेंब सुध्दा पडत नाही. महिनाभरात तीनवेळा निवेदन दिले. मात्र नगरपंचायतीने केवळ आश्वासनांची पाने पुसली. नगरपंचायत पिण्याचे पाणी देण्यास सपशेल अपयशी ठरली. अखेरीस पाण्यावाचून संतापलेल्या २०० वर महिला शुक्रवारी दुपारच्या सुमारास भर उन्हात नगरपंचायतीवर धडकल्या व त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणा देत मडके फोडले.
शहरातील बहुतांश भाग कृत्रिम पाणीटंचाईने ग्रासला आहे. त्यातही प्रभाग क्र. ११ मध्ये चक्रधर स्वामी मंदिर परिसरातील भागात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या परिसरात प्रत्येक घरी नळ आहे. मात्र नळाला पाणी येत नाही. नगरपंचायतीचा नियोजनशून्य कारभार आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष त्याला कारणीभूत ठरले आहे. उन्हाळ्यात तर ही समस्या अधिकच तीव्र बनली आहे. त्यामुळे येथील महिला भर उन्हात पाण्यासाठी दाहीदिशा पायपीट करत आहेत. यासंदर्भात येथील महिलांनी महिनाभरात तीनवेळा नगरपंचायतीला निवेदने दिली. टँकरची सुविधा केवळ दिखाव्यापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे सदर परिसरातील संतापलेल्या दोनशेवर महिला डोक्यावर मातीचे मडके घेऊन शुक्रवारी दुपारच्या सुमारास नगरपंचायतीवर धडकल्या. नगरपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याविरोधात त्यांनी घोषणाबाजी केली. मुख्याधिकारी सुवर्णा दखणे रजेवर असल्याने अधीक्षकांनी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांना कळविले. तोवर या महिलाभगिनी तब्बल दोन तास उन्हात ठिय्या मांडून होत्या. दरम्यान, महिलांनी डोक्यावरील मातीचे मडके फोडत आक्रोश व्यक्त केला. त्यानंतर तहसीलदार कांबळे यांनी नगरपंचायत कार्यालयात येऊन महिलांशी संवाद साधला. पाणी पुरवठा अभियंता नीलेश नरपाचे यांच्याकडून पाणी टंचाईची कारणे जाणून घेत, आवश्यक त्या सूचना दिल्या.
यावेळी ललिता भोयर, विशाखा मोटघरे, नीशा उके, मालती मेश्राम, वनीता जनबंधू, छाया सुरईकर, दर्शना रामटेके, सुकेशना गजभीये, नंदा गजभीये, भावना गजभीये, सोनू नागदेवते, गीता भोयर, निकिता भजभूजे, इंदू धनविजय, गीता नागपुरे, रूपाली गेडाम, आचल नागपुरे आदी महिलांसह गुलाब जनबंधू, रोशन गायधने उपस्थित होते. सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे व पोलीस कर्मचारी सुध्दा यावेळी तैनात होते.
पर्यायी नको, कायमस्वरूपी योजना पाहिजे
आमच्या परिसरात १४ वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. त्यामुळे आता टँकर पाठवून पर्यायी व्यवस्था नको, तर कायमस्वरूपी उपाय पाहिजे, अशी कैफियत महिलांनी मांडली. शिवाय काही घरी टिल्लू पंपाचा वापर होत असल्यामुळे आमच्या घरी पाणी पोहोचत नाही. काहींच्या घरी दोन-दोन नळ कनेक्शन्स आहेत. पाणी पुरवठ्याचे सुरू असलेले काम रखडले आहे, असे त्या म्हणाल्या.