दयानंद पाईकरावलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: रेल्वे म्हणजे देशाची जीवनदायिनी. रुळावर धडधड करीत दररोज देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यावर धावणाऱ्या हजारो रेल्वेगाड्या प्रवाशांच्या गरजेशी नव्हे तर भावनेशीही जुळल्या आहेत. देशाचा मध्यबिंदू म्हणून नागपुरातून या जीवनदायिनीचे संचालन एक मोठ्या जबाबदारीचे काम आहे. ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहे ती एक महिला. त्या म्हणजे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय. समर्पण आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या भरवशावर कोणत्याही क्षेत्रात महिला भरारी घेऊ शकते, याचे मूर्तिमंत उदाहरणच त्या आहेत.जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर दपूम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. आपला जीवन प्रवास उलगडून दाखविताना त्या म्हणाल्या, माझा जन्म भोपाळमध्ये झाला. शिक्षणाची प्रेरणा कुटुंबापासून मिळाली. वडील आयपीएस अधिकारी होते तर आईही शिक्षित असून इंग्रजी, हिंदीच्या लेखिका आहेत. कुटुंबाकडून प्रेरणा मिळाल्यामुळे उच्च शिक्षण घेता आले. १९८६ मध्ये महिला इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात जाण्याचे प्रमाण अगदी कमी होते. तरीसुद्धा कुटुंबीयांच्या प्रेरणेमुळे या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. बीई उत्तीर्ण केल्यानंतर १९८७ मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली. दरम्यान लग्न ठरले. लग्नानंतर यूपीएससी उत्तीर्ण होऊन ‘इंडियन रेल्वे सर्व्हिस फॉर सिग्नल इंजिनिअर’ म्हणून निवड झाली. पती संजय बंदोपाध्याय आयएएस असून, ते दिल्लीला शिपिंगमध्ये अतिरिक्त सचिव आहेत. सासू-सासरेही उच्चशिक्षित होते. त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच रेल्वेची नोकरी स्वीकारली. रेल्वेची नोकरी २४ तासांची, जोखमीची आणि आव्हानात्मक आहे. कुटुंब आणि नोकरी सांभाळण्यात संघर्ष करावाच लागतो. पण कुटुंबाचे भक्कम पाठबळ मिळाल्याने त्यात यशस्वी झाले. मुलाला उच्चशिक्षित करून कुटुंबही व्यवस्थित सांभाळले. नोकरीतही आपल्या कामाची चुणूक दाखविली. नोकरीतील सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. त्यामुळेच आपल्या कार्याची दखल घेऊन रेल्वेने उत्कृष्ट अधिकारी म्हणून अनेक अवॉर्ड देऊन गौरवान्वित केले.
Women's Day 2019; रेल्वेच्या ‘हमसफर’; डीआरएम शोभना बंदोपाध्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 10:26 AM
रेल्वे म्हणजे देशाची जीवनदायिनी. नागपुरातून ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहे ती एक महिला. त्या म्हणजे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय.
ठळक मुद्देजीवनदायिनीच्या सेवेतून यशोभरारी