‘सुप्रभा विश्व’चे प्रकाशन : कांचन गडकरी यांचे प्रतिपादन नागपूर : प्रगतशील आणि सृजनशील समाजनिर्मितीमध्ये महिलांचा सिंहाचा वाटा आहे. घराघरात आणि मनामनात मूल्याधिष्ठित शिक्षणाचा खरा प्रसार जर कुणी करीत असेल तर ती स्त्री आहे. त्यामुळे महिलेचा सन्मान आणि तिच्या आरोग्याचे रक्षण करणे, ही समाजाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन पुणे सेवासदनच्या अध्यक्षा कांचन गडकरी यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. चैतन्य शेंबेकर आणि डॉ. मनीषा शेंबेकर यांच्यावतीने एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडकरी बोलत होत्या. ओमेगा हॉस्पिटलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. गडकरी पुढे म्हणाल्या, गरीब आणि गरजू महिलांना आधार देऊन तळागळातील महिलांवर होणारे अत्याचार थांबविण्याकरिता समाजातील पुढारी महिलांनी आणि सामाजिक संस्थांनी पुढे आले पाहिजे. दुर्दैवाने आज अनेक महिला निमूटपणे अन्याय सहन करतात. त्यांना बळ देण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. डॉ. चैतन्य शेंबेकर यांनी महिलांच्या आरोग्याविषयी माहिती देताना विविध समस्यांवर प्रकाश टाकला. कोणत्याही दुर्धर आजारांवर प्रबळ इच्छाशक्तीने मात करता येते, असे त्यांनी सांगितले. यावेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ऋतुजा वाडेकर यांनी संपादित केलेल्या ‘सुप्रभा विश्व’ या त्रैमासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन कांचन गडकरी, डॉ. चैतन्य शेंबेकर व सारंगी मेंडजोगे यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाविषयी बोलताना गडकरी म्हणाल्या, या अंकातील मांडणी आणि लेखांचा दर्जा उत्तम आहे. या पुस्तकात डॉ. मनीषा शेंबेकर यांच्या आरोग्य विषयावरील लेखासह केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी, जागतिक ख्यातीच्या बॉक्सर मेरी कॉम, डॉ. निशिगंधा वाड, प्राची जावडेकर, तरिता शंकर, विष्णू मनोहर, विजया राहटकर, हेमंत कुलकर्णी, राही भिडे व पिंकी आनंद अशा विविधि क्षेत्रातील महिलांचे वाचनीय लेख आहेत. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मनीषा शेंबेकर यांनी केले. (प्रतिनिधी)
महिलांचा सन्मान समाजाची जबाबदारी
By admin | Published: March 14, 2016 3:13 AM