लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलमधील एका महिला डॉक्टरची बॅग चोरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोरट्यास शुक्रवारच्या मध्यरात्री मेडिकल रुग्णालयातील सुरक्षारक्षकांनी मोठ्या शिताफीने पकडले. चोरट्याजवळून मिळालेल्या बॅगमधून लॅपटॉपसह विदेशी नोटा, नाण्यांसह लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.मेडिकलमध्ये सेवा देत असलेल्या डॉ. अनुपमा हेगडे यांची पर्स वॉर्ड नं.४७ या डॉक्टर रूममधून शुक्रवार १४ डिसेंबरच्या सायंकाळी ७ वाजता चोरीला गेली. प्राप्त माहितीनुसार, या बॅगमध्ये पर्स, लॅपटॉप, विदेशी चलन, एटीएम कार्ड व पैसेसुद्धा होते. चोरीची माहिती पेट्रोलिंग टीमच्या जवानांना मिळाली. सुरक्षारक्षकांनी ही माहिती महाराष्ट्र सुरक्षा बलचे सुरक्षा पर्यवेक्षक शरद दाते यांना दिली. दाते यांच्या मार्गदर्शनाखाली जवान अंकुश खानझोडे, विकास चव्हाण, उमाकांत बडोले, नरेंद्र वानखेडे यांनी रात्री ८ वाजेपासून मेडिकलचा संपूर्ण परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली. शुक्रवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास वॉर्ड नं. १६ समोर एक १५ वर्षीय मुलगा फिरताना आढळला. खानझोडे व इतर सुरक्षारक्षकांनी त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडे डॉ. हेगडे यांची बॅग दिसली. तपासणी केली असता त्या बॅगमध्ये डॉ. हेगडे यांची सर्व कागदपत्रे आढळून आली. त्याला त्वरित सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने काही वस्तू त्याचा मित्र नीलेश उत्तमराव गवई (२२) रा. बालाजीनगर महिंद्रा चौक, नागपूर याच्याकडे ठेवल्याचे सांगितले. अंकुश खानझोडे व नरेंद्र वानखेडे यांनी मध्यरात्रीच बालाजीनगरात जाऊन पहाटे ४ वाजताच्या सुमारास नीलेशला पकडून आणले. नीलेशकडे ७४ हजार रुपयांचा लॅपटॉप, विदेशी नोटा व नाणे, भारतीय चलन २३०० रुपये आढळून आले. हा सर्व लाखोंचा मुद्देमाल डॉ. हेगडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी दोघांनाही अजनी पोलिसांच्या स्वाधीन केले.