लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : टेरेसवर छुपे कॅमेरे लावून सकाळ-संध्याकाळ महिलांचा व्यायाम बघणाऱ्या एका भामट्याचा चावटपणा तब्बल ११ महिन्यांनंतर उघड झाला. त्यानंतर संतप्त महिलांनी सुधीर हडगे (वय ५०) या आरोपीविरुद्ध हुडकेश्वर ठाण्यात धाव घेतली. (Women's exercise of watching with hidden cameras on the terrace)
आरोपी सुधीर आणि तक्रार करणारी महिला (वय ५२) एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात. महिला सकाळ-सायंकाळ अन्य काही महिलांसह आपल्या अपार्टमेंटच्या टेरेसवर व्यायाम करतात. आरोपी सुधीरने नकळतपणे टेरेसवर ठिकठिकाणी छुपे कॅमेरे लावले. त्यातून तो महिलांचा व्यायाम बघत होता. ३० ऑक्टोबर २०२० पासून त्याचा हा चावटपणा सुरू होता. १२ ऑगस्टला पहाटे ५.३० वाजता तक्रारदार महिला नेहमीप्रमाणे व्यायाम करीत असताना तिला शंका आली. त्यानंतर तिने नातेवाइकांकडून तपासणी करून घेतली असता आरोपी सुधीरची मानसिक विकृती पुढे आली. यासंबंधाने २३ ऑगस्टला मोठा वाद झाल्यानंतर महिलेने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार सार्थक नेहते यांनी तक्रारीची शहानिशा करून घेत मंगळवारी या प्रकरणात विनयभंग तसेच धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
महिलेचा पाठलाग करून टॉन्टिंग
आरोपी सुधीर हा कॅमेरात महिलांना बघत होताच. तक्रारदार महिला घराबाहेर पडली की तिचा पाठलाग करायचा. तिला अश्लील हातवारे करून टॉन्टिंगही करायचा, असेही महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणाची हुडकेश्वर परिसरात दोन दिवसांपासून उलटसुलट चर्चा असून, सुधीर हडगेनेही पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी दांपत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक एस. कोडापे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
---