नागपूर : ऑटोमध्ये स्वार महिला प्रवाशांनी रोख रक्कम आणि दागिने पळविल्याची घटना घडली आहे. कुही येथील रहिवासी वैजयंती चाखोबा मेश्राम २८ जूनला दुपारी बसस्थानकावर पोहोचल्या. तेथून ऑटोने मुलीच्या घरी जात होत्या. मेडिकल चौकात दोन महिला ऑटोत बसल्या. त्यांनी वैजयंतीची नजर चुकवून पर्समधून १० हजार रुपये आणि २४ हजाराचे दागिने पळविले. सक्करदरा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
............
नंदनवनमधील हवालदारास मारहाण
नागपूर : वाहन चांगले उभे करण्याचा सल्ला दिल्यामुळे ट्रक चालकाने नंदनवन ठाण्यातील हवालदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. नंदनवन ठाण्यातील हवालदार सुधाकर सोनकुसरे यांना सोमवारी रात्री केडीके कॉलेज मार्गावर ट्रक क्रमांक एमएच १८, एएसी ३४५५ उभा दिसला. सुधाकर ट्रक चालक शालिकराम भरोते यास वाहनचालकांना ट्रकमुळे अडथळा होत असल्याचे सांगून चौकशी करीत होते. भरोतेला त्याचा राग आला. तो मारहाणीवर उतरला. नंदनवन पोलिसांनी भरोतेविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. नंदनवन पोलिसांशी वाद घालण्याच्या घटनात वाढ झाली आहे. यामुळे पोलिसात रोष आहे. अधिकाऱ्यांनी असामाजिक तत्त्वांना आश्रय दिल्यामुळे गुन्हे दाखल होत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
.......