तीक्ष्ण शस्त्राने भोसकले : अल्पवयीन आरोपी ताब्यात नागपूर : गिट्टीखदानमधील एका महिला वकिलाची अल्पवयीन आरोपीने तीक्ष्ण शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या केली. शुक्रवारी रात्री ७ ते ७.३० च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे.राजश्री ऊर्फ राजेशकुमारी विश्वस्वरूप टंडन (वय ५२) असे मृत महिला वकिलाचे नाव आहे. त्या गिट्टीखदानमधील पशुवैद्यकीय महाविद्यालयाजवळ मानवसेवानगरात राहत होत्या. पोलिसांच्या माहितीनुसार, बाजूलाच राहणाऱ्या आरोपीच्या परिवारासोबत त्यांचा अनेक वर्षांपासून वाद होता. आरोपीचे आजोबा यांच्याविरुद्ध कारवाई करवून घेतानाच राजश्री यांनी आपल्या प्रभावाचा गैरवापर करून घेत आरोपीच्या वडिलांवरही दोन वर्षांपूर्वी हद्दपारीची कारवाई करून घेतली होती. येणाऱ्या जूनमध्ये हद्दपारीचा अवधी संपणार असल्याने त्या आरोपीच्या परिवारातील इतरांना त्रास देत होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ७ च्या सुमारास त्या आरोपीच्या घराजवळून जात होत्या. त्याचवेळी आरोपी समोरून येत असल्याचे पाहून राजश्री यांनी त्याला टोमणा मारला. त्यावरून वाद वाढल्यानंतर राजश्रीने आरोपीच्या कानशिलात लगावली. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने घरातून चाकू आणला आणि राजश्रीचा पाठलाग करून सपासप चाकूचे घाव घातले. जीव वाचविण्यासाठी त्या बाजूच्या स्टुडिओकडे पळाल्या. मात्र, आरोपीने तेथे जाऊन त्यांच्यावर चाकूचे घाव घातले. त्या ठार झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपी पळून गेला. घटनेची माहिती कळताच परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. पोलीस उपायुक्त राकेश कलासागर, अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. गिट्टीखदानचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम यांचा ताफा पोहचला होता.(प्रतिनिधी) आरोपी दहावीचा विद्यार्थी पोलिसांच्या माहितीनुसार, वकील असूनही राजश्री यांचे वर्तन वादग्रस्त होते. त्यांच्यावर सात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपीचे वय अवघे १५ वर्षे असून, त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. राजश्री यांच्याकडून होणारा त्रास असह्य झाल्यामुळेच आपण हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. तो किती खरा बोलतो, ते चौकशीत स्पष्ट होणार असल्याचे ठाणेदार निकम यांनी सांगितले.
महिला वकिलाची हत्या
By admin | Published: April 15, 2017 1:59 AM