गणेशपेठ येथील प्रकार : कारवाई का नाही ? नागपूर : शहरातील तीन महिला माफियाने शनिवारी मध्यरात्री गणेशपेठ ठाण्यात चांगलाच गोंधळ घातला. तीन तास गोंधळ घालून त्या परतल्या. सूत्रानुसार महिला माफियापैकी एक गणेशपेठ ठाणे परिसरात अवैध दारूची विक्री करते. तिच्या विरुद्ध खुनासह अवैध दारु विक्रीचे गुन्हे दाखल आहेत. तिने एका तरुणाचा खून केला होता. त्या महिलेने मृताची पत्नी आणि दोन साक्षीदारांच्या विरुद्ध चार महिन्यांपूर्वीच खोटी तक्रार दाखल केली होती. दुसरी महिला लकडगंज ठाणे परिसरात मादक पदार्थ आणि अवैध दारूची विक्री करते तर तिसरी महिला अवैध दारूआणि तरुणींच्या खरेदी विक्रीच्या धंद्याशी जुळलेली आहे. सूत्रानुसार तिघीही रात्री १२ वाजता कारने गणेशपेठ ठाण्यात पोहोचल्या. तिघीही मद्यधुंद होत्या. त्यांनी एका प्रतिस्पर्ध्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी आल्याचे सांगितले. त्यावेळी ठाण्यात सात ते आठ पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तिघींनाही पोलीस चांगल्या पद्धतीने ओळखत असल्याने पोलिसांनी त्यांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्या महिला संतप्त झाल्या आणि तक्रार दाखल करून घेण्याची मागणी करू लागल्या. त्यांनी ठाण्यासमोरच गोंधळ घालायला सुरुवात केली. पोलिसांनी त्या महिलांशी संबंधित लोकांना याची माहिती दिली. दारू पिऊन ठाण्यात गोंधळ घातल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या महिलांचे साथीदार ठाण्यात आले. त्यांनी खूप समजवल्यानंतर रात्री ३ वाजता तिन्ही महिला ठाण्यातून परतल्या. (प्रतिनिधी)
महिला माफियांचा ठाण्यात गोंधळ
By admin | Published: August 31, 2015 2:37 AM