योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: संपूर्ण जगात युद्धाची स्थिती आहे. ईस्त्रायलवर हल्ला करणाऱ्या हमाससारख्या राक्षसी वृत्तीचा सर्वनाश झाला पाहिजेच. लहान देश असला तरी तेथील लोक देशासाठी लढण्यासाठी तयार असतात. इस्त्राईलच्या प्रत्येक नागरिकाला सैन्य प्रशिक्षण मिळते. तेथील महिलांमध्ये देशाबाबत ज्या पद्धतीचे देशप्रेम व देशभर्ती आहे, त्यापासून नारीशक्तीने प्रेरणा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केले. राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे शुक्रवारी रेशीमबाग येथील मैदानावर आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी बडोदा येथील श्री स्वामीनारायण देव महिला मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ.उर्वशी मिश्रा, कार्यवाहिका करुणा साठे प्रामुख्याने उपस्थित होत्या. लोकांमध्ये भारतात महिलांबाबत अध्यात्मिक एकता आहे. प्राचीन काळापासून महिला सर्वच क्षेत्रात समोर होत्या. मात्र परकीय आक्रमणांमुळे समाजात विकृती निर्माण झाल्या. त्या विकृती ठीक करणे हे आपले कर्तव्य आहे. भारतात महिलांचे शोषण होत आहे, त्यांना सन्मान मिळत नाही असा अपप्रचार होतो. ‘नॅरेटिव्ह’च्या माध्यमातून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. हा अपप्रचार मोडून काढण्यासाठी देशातील महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे शांताक्का म्हणाल्या. आपल्या देशातील महिलांमध्ये प्रचंड कर्तृत्व आहे. महिलांना संधी मिळाली तर त्या देशाला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकतात व ते वारंवार दिसून आले आहे, असे प्रतिपादन डॉ.मिश्रा यांनी केले. या कार्यक्रमाला नागपूरातील निरनिराळ््या शाखांमधील सेविकांची उपस्थिती होती. शाळकरी मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यतचा समावेश असलेल्या सेविकांच्या पथकाने योगासने, घोष, लेझिम यांची निरनिराळी प्रात्यक्षिके सादर केली.
आत्मकेंद्रित होणारी कुटुंबे ही धोक्याची घंटा
भारतातील कुटुंब आत्मकेंद्रित होत आहेत व सुखाची कल्पना वेगळी होत आहे. मुळ सुखाच्या कल्पनेपासून लोक दूर जात आहे. यामुळे कुटुंबात भावना संकुचित होत आहेत. यातून बाहेर येत वसुधैव कुटुंबकम यासारखे श्रेष्ठ विचार समाजात पोहोचविले पाहिजे. कुटुंब भावनात्मक दृष्टीने सशक्त असायला हवे व संस्कृतीच्या मुळांशी जुळलेले पाहिजे, असे शांताक्का म्हणाल्या.
समलैंगिक विवाहांची याचिका विदेशी विचारांच्या प्रभावातूनच
समलैंगिक विवाहांच्या याचिकेबाबत कोट्यवधी लोकांच्या भावना व हजारो वर्षांच्या संस्कृतीचा सर्वोच्च न्यायालयाने सन्मान राखला. या याचिकेचा आम्ही विरोध केला होता. दोन न्यायाधिशांनी या याचिकेच्या मुद्द्यांना संमती दिली आहे. आज अनेक जण विदेशातील प्रभावाखाली असून तशाच गोष्टी भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापासून सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, असे मत शांताक्का यांनी व्यक्त केले.
महिलांनी ‘कॅरिअर विथ कल्चर’ला महत्त्व द्यावे
तंत्रज्ञान, गणित, विज्ञानमध्ये मुलांपेक्षा भारतीय मुली समोर आहेत. करिअरला महिलांनी महत्त्व दिलेच पाहिजे. मात्र संस्कृतीशीदेखील जुळून रहायला हवे. कोणत्याही क्षेत्रात रहा, मात्र कर्तव्य व काम भारतीय जीवनमूल्य व संस्कृतीनुसार हवे. महिलांनी ‘कॅरिअर विथ कल्चर’ला महत्त्व दिले पाहिजे, असे आवाहन शांताक्का यांनी केले.