लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आजपर्यंत आरोपींनी दारूच्या तस्करीसाठी वेगवेगळी शक्कल लढविली आहे. सोमवारीही एका आरोपीने आपल्या पायाला दारूच्या बाटल्या दोरीच्या साह्याने गुंडाळल्या. जीन्सच्या आतून घातलेल्या बरमुड्यातही बाटल्या भरल्या. परंतु गाडीची वाट पाहत असताना रेल्वे सुरक्षा दलाची करडी नजर त्याच्यावर गेली अन् त्याला मुद्देमालासह अटक करण्यात आली.भय्यालाल पांडुरंग तेलंग (४४) रा. महाराणाप्रताप वॉर्ड, बल्लारशाह आरोपीचे नाव आहे. भय्यालालला दारूची तस्करी करण्याच्या गुन्ह्यात यापूर्वीही अटक झालेली आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास तो प्लॅटफार्म क्रमांक ३ वर गाडीची वाट पाहत होता. यावेळी कर्तव्यावर असलेले आरपीएफचे जवान दिनेशसिंग, विकास शर्मा, विवेक कनोजिया, अर्जुन पाटोळे आणि रामसिंग ठाकूर यांना भय्यालालवर शंका आली. त्याने सैल असलेली जीन्स पँट आणि जीन्सचे जॅकेट घातले होते. एवढ्या गरमीच्या वातावरणात जीन्सचे जॅकेट घातल्यामुळे आरपीएफ जवानांना शंका आली. त्यांनी त्याची चौकशी केली असता जीन्समध्ये दारू असल्याची कबुली त्याने दिली. जीन्समधील बरमुड्यातील खिशात आणि पायाला दारूच्या बाटल्या दोरीने बांधल्याचे त्याने सांगितले. लगेच त्यास अटक करून रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात आणण्यात आले. एकूण ६० दारूच्या बाटल्या तो घेऊन जात होता. रेल्वे सुरक्षा दलाने कागदोपत्री कारवाई पूर्ण करून आरोपीला मुद्देमालासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द केले. ही कारवाई रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक वीरेंद्र वानखेडे आणि जवानांनी पार पाडली.
अफलातून तस्करी : पायाला बांधल्या दारूच्या बाटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 12:26 AM
आजपर्यंत आरोपींनी दारूच्या तस्करीसाठी वेगवेगळी शक्कल लढविली आहे. सोमवारीही एका आरोपीने आपल्या पायाला दारूच्या बाटल्या दोरीच्या साह्याने गुंडाळल्या. जीन्सच्या आतून घातलेल्या बरमुड्यातही बाटल्या भरल्या. परंतु गाडीची वाट पाहत असताना रेल्वे सुरक्षा दलाची करडी नजर त्याच्यावर गेली अन् त्याला मुद्देमालासह अटक करण्यात आली.
ठळक मुद्देनागपूर रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई